Sunil Shelke on Rohit Pawar : दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मृत्यूबाबत विविध यंत्रणांकडून सध्या तपास सुरू असून सीआयडी तसेच केंद्र सरकारच्या काही यंत्रणाही या प्रकरणाची चौकशी करत आहेत. त्यामुळे तपास पूर्ण होण्यापूर्वी कोणतीही भूमिका मांडणे किंवा संशयाचे वातावरण निर्माण करणे योग्य नाही, असा टोला आमदार सुनील शेळके यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता लगावला. महाराष्ट्रातील साडेतेरा कोटी जनतेसमोर या घटनेची संपूर्ण सत्यता येणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तपासासात शंका आल्यास आम्ही आवाज उठवू
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार हे तिघेही या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देत आहेत. विविध यंत्रणांकडून तपास सुरू असून तो पारदर्शकपणे पूर्ण होईल. तपास अहवाल आल्यानंतर त्यात काही शंका किंवा माहिती दडपली गेल्याचे आढळल्यास आम्ही नक्कीच आवाज उठवू; मात्र तपास सुरू असताना राजकीय आरोप-प्रत्यारोप करणे आम्हाला मान्य नाही, असं शेळके म्हणाले.
२० ते २५ आमदारांसह सुनीत्रा पवार यांची भेट
प्रफुल पटेल यांच्या अनुपस्थितीत झालेल्या बैठकीबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिले. २० ते २५ आमदारांसह आम्ही उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार यांची भेट घेतली होती. ही भेट केवळ तालुक्यातील विकासकामे आणि अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंजुरी मिळवण्यासाठी होती. मात्र त्या भेटीबाबत वेगवेगळ्या चर्चा आणि बातम्या लावल्या गेल्या, असेही शेळके यांनी नमूद केले.
सुनीत्रा पवार या सक्षम आणि कणखर नेत्या
सुनीत्रा पवार या सक्षम आणि कणखर नेत्या असून त्यांना कोणत्याही प्रकारच्या दबावाची किंवा मार्गदर्शनाची गरज नाही. त्या स्वतः निर्णय घेण्यास सक्षम आहेत, असे सांगत त्यांनी बैठकीबाबत निर्माण झालेल्या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अजित पवार यांच्या मृत्यूचा तपास पूर्ण होऊन सत्य समोर येईपर्यंत संयम बाळगण्याचे आवाहनही आमदार सुनिळ शेळके यांनी केले.











