आज विजयादशमीच्या म्हणजेच दसऱ्याच्या निमित्ताने शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विविध विषयांवर नजर टाकली. यावेळी पावसाचे सावट या मेळाव्यावर पडल्याचे दृश्य दिसत होते. यामुळे हा शिवसेनेचा दशहरा मेळावा होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. परंतु भर पावसात हा मेळावा पार पडला. यावेळी खास लक्ष होते ते म्हणजे राज ठाकरे यांचे. परंतु राज ठाकरे या मेळाव्यात अनुपस्थित होते. यामुळे नागरिकांची प्रचंड हिरमोड झाली.
मुंबई येथील शिवाजी पार्क मैदान येथे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी दसरा मेळाव्याची तयारी सुरु असतानाच पावसाने थैमान घातले होते. यामुळे हा मेळावा पार पडणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. परंतु या पावसाचा विचार न करता हजारो शिवसैनिक भाषण ऐकण्यासाठी एकवटल्याचे दिसून आले. काहींनी याठिकाणी छत्र्या उघडून मेळाव्याचा आनंद घेतला. एकेकाळी शांततेत भाष्य करणारे उद्धव ठाकरे मेळाव्यात फार जोमात दिसून आले. त्यांनी तुफान टोलेबाजी करत विरोधकांवर टीका टिपणी केली.
एकनाथ शिंदे अमित शहांच्या जोड्याचा भार वाहणारे गाढव
शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मेळाव्यात सांगितले की, बऱ्याच जणांचे लक्ष आपले पक्ष फोडण्याकडे असून त्यांना वाटते कि, काही लोकांना त्यांनी पळवले आहे. म्हणून आता पक्ष फोडता येईल, पण जे पळून गेले ते पितळ होते आणि जे राहिलेत ते सोने आहे. असे भाष्य करत त्यांनी शिवसेनेच्या पक्षफुटीवर भाष्य केले. यासह त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता बाळासाहेबांची शाल पांघरणारा गाढव असे म्हणत टीका केली. गाढवावर कितीही शाली टाकली तरीही गाढव ते गाढवच राहणार, अमित शहांच्या जोड्याचा भार वाहणारे ते गाढव असून जनता यांना एक दिवस जोडे मारल्याशिवाय राहणार नाही, आणि तो दिवस लांब नसल्याचेही ते यावेळी म्हणाले.
कमळाबाईंच्या कारभाऱ्याने स्वत:ची कमळं फुलवली
बऱ्याच जणांची इच्छा होती कि हा दसरा मेळावा होऊ नये, तर बरेच जण म्हणत होते मेळावा होणार तरी कसा..? मी म्हणालो, दरवर्षी होतो तसाच यंदाही होणार, उलट मी सांगत होतो, यावर्षी मोठा मेळावा होणार, परंतु जो चिखल झाला आहे त्याला कारणीभूत आहे कमळाबाई. आता तुम्ही म्हणाल पावसाचा आणि कमळाबाईचा काय संबंध ? परंतु कमळाबाईंच्या कारभाऱ्याने स्वत:ची कमळं फुलवली आंणि बाकीच्यांच्या आयुष्याचा चिखल करून टाकल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजप वर निशाणा साधला.