Ajit Pawar legacy : 28 जानेवारीची सकाळ महाराष्ट्रासाठी काळा दिवस ठरली. महाराष्ट्रानं आपला लाडका दादा गमावला, आता दादांच्या मृत्यूला महिना होत आल्यानंतर आता चर्चा सुरू झाली ती दादांच्या लाडक्या बारामतीची. दादांच्या हृदयातली बारामती आता कुणाची. दादांसारखं बारामतीला कोण सांभाळणार? जगाच्या पाठीवर कुठंही असलं तरी बारामतीवर दादांसारखं लक्ष कोण ठेवणार? बारामतीच्या विकासासाठी रात्रंदिवस कोण झटणार? भल्या पाहटे उठून बारामतीत विकास कामांची पाहणी करत अधिकाऱ्यांना धारेवर कोण धरणार? म्हणजेच बारामतीचा आमदार आता कोण होणार? या विषयीचा आढावा घेऊया…
हेही वाचा – शरद पवार खासदार होणार! काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेसोबत बोलणी सुरू, सुप्रिया सुळेंनी फिल्डिंग लावली?
पुणे जिल्ह्यातील बारामती मतदारसंघात पुन्हा एकदा जोरदार राजकीय चर्चा रंगल्या आहेत. अजित पवार यांच्या अकस्मात निधनानंतर अख्ख्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली. दादांनंतर राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या या मतदारसंघावर नेमका कोणाचा प्रभाव पडणार, याबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे. बारामती हा मतदारसंघ अनेक वर्षांपासून शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांचा बालेकिल्ला मानला जातो. विकासकामे, सहकारी संस्था आणि शैक्षणिक प्रकल्पांमुळे बारामतीची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. स्थानिक पातळीवर नागरिकांच्या प्रश्नांवर, विकासकामांवर आणि तरुण मतदारांच्या भूमिकेवर यंदा विशेष लक्ष असेल. त्यामुळे “बारामती कोणाची?” हा प्रश्न केवळ राजकीय नसून, जनतेच्या अपेक्षा आणि भविष्यातील नेतृत्व याभोवती फिरताना दिसतो.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाकडून सुरू
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे. या विधानसभा मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम आयोगाने जाहीर केला… १ जानेवारी २०२६पर्यंत नाव नोंदविलेले मतदार पोटनिवडणुकीत मतदान करतील. या मतदारसंघासाठी १० मार्चला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणूक लढणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पोटनिवडणूक लढण्यावर एकमत झाले आहे. बारामती विधानसभेची प्रारूप मतदार यादी १० मार्चला प्रसिद्ध झाल्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निवडणूक बिनविरोध करण्यावर भर असणार आहे.
दादांची बारामती सुनेत्रा पवारच सांभाळणार, कोअर कमिटीत निर्णय
अजितदादांची बारामती सुनेत्रा पवारच सांभाळणार असल्याचे कोअर कमिटीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय झाला… तर पार्थ पवार राज्यसभेवर जाणार असल्याचे म्हटलं जातयं.. आगामी राज्यसभा निवडणुकीत पार्थ पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील, असा निर्णय पक्षाकडून घेण्यात आल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच 26 फेब्रुवारीला होणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसंदर्भात आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक तयारी विषयी या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. येत्या काही दिवसांमध्ये वरळी डोम येथे राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. जिथे सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब केले जाणार आहे. त्यामुळे दादांचा वारसा राज्यापासून ते अगदी बारामतीपर्यंत सुनेत्रा पवारच चालवणार अशी शक्यता आता निर्माण झाली आहे, सगळ्यांचं लक्ष आहे ती ही निवडणूक बिनविरोध होते की एखादा नवा ट्विस्ट येतो? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलं आहे.












