नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान 6 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीपूर्वी सर्व पक्ष आपला प्रचार वेगवान करत आहेत. भाजपा आणि जेडीयू समान जागांवर निवडणूक लढवत आहेत. त्यामुळं भाजपाचं प्रचार मॉड्यूल खूपच वेगळं आणि आकर्षक दिसत आहे. भाजपानं बिहारमध्ये विजयासाठी प्रचार करण्यासाठी आपले खासदार आणि मुख्यमंत्री देखील मैदानात उतरवले आहेत. दरम्यान, पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील बिहारमध्ये अनेक सभा आणि जाहीर सभा घेणार आहेत.
पंतप्रधानांच्या 12, अमित शहा यांच्या 25 सभा :
बिहार भाजपा प्रभारी दिलीप जैस्वाल यांनी स्पष्ट केलं आहे की बिहारमध्ये भाजपाच्या विजयासाठी पंतप्रधान मोदी स्वतः जनतेला संबोधित करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये 10 ते 12 सभा घेणार आहेत. त्यांचा पहिला रोड शो समस्तीपूरमध्ये असेल, त्यानंतर बेगुसरायमध्ये. ते 23 ऑक्टोबर रोजी भागलपूर, गया आणि सासाराममध्येही जाहीर सभा घेतील. तसंच पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी, पंतप्रधान मोदी 28 ऑक्टोबर रोजी दरभंगा, मुझफ्फरपूर आणि पाटणा इथं सभा घेणार आहेत. त्यानंतर 1 नोव्हेंबर रोजी ते छपरा आणि पूर्व चंपारण इथं रोड शो करतील. त्यानंतर, 3 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान पश्चिम चंपारण, सहरसा आणि अररिया इथं प्रचार करतील.
अमित शहा यांच्या 25 रॅली :
अमित शाह या रॅलींद्वारे एनडीए कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करतील, ज्यामुळं त्यांचा उत्साह आणखी वाढेल. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि एनडीए गटांमध्ये कोणताही वाद होऊ नये यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळ देखील प्रचार करत आहे. अमित शाह वेगवेगळ्या दिवशी राज्यभरात विविध ठिकाणी एकूण 25 रॅली घेणार आहेत. ते 12 जाहीर सभांनाही संबोधित करतील. राजनाथ सिंह आणि नितीन गडकरी देखील त्यांच्यासोबत जाहीर सभांना उपस्थित राहणार आहेत