सीकर : राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील रिंगास-श्रीमाधोपूर रेल्वे कॉरिडॉरवर मोठा रेल्वे अपघात झाला. अपघातात मालगाडीचे सुमारे 38 डबे रुळावरुन घसरले. या अपघातानंतर रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. तांदळानं भरलेली मालगाडी फुलेराहून रेवाडीकडे जात होती. अपघाताची धडक इतकी भीषण होती की अनेक डबे एकमेकांवर आदळले. त्यानंतर रुळांवर तांदळाचा मोठा ढीग पडला होता.
रेल्वे ट्रॅकजवळ बघ्यांची मोठी गर्दी :
उत्तर पश्चिम रेल्वेचे (NWR) जयपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) राय जैन यांनी सांगितलं की, ही घटना मुंबई आणि दिल्लीला जोडणाऱ्या श्रीमाधोपूर रेल्वे स्थानकाजवळील बी केबिन परिसरात घडली. मालगाडी मुख्य मार्गावरून लूप मार्गावर वळत असताना एक डबा अचानक रुळावरुन घसरला. त्यामुळं त्याच्या मागे असलेले सुमारे 38 डबे एकामागून एक रुळावरुन घसरले. मालगाडीचे डबे घसरल्यानं आजूबाजूच्या परिसरातील लोक जागे झाले. त्यानंतर रेल्वे ट्रॅकजवळ बघ्यांची मोठी गर्दी जमली.
अपघाताचं कारण शोधण्याचं काम सुरु :
अपघाताची माहिती मिळताच, वरिष्ठ रेल्वे अधिकारी आणि तांत्रिक तपासणी करण्याकरिता पथकं घटनास्थळी पोहोचली. मदत आणि बचाव कार्य रात्रभर सुरु राहिलं. रेल्वे कर्मचाऱ्यांनी क्रेन आणि अवजड यंत्रसामग्रीचा वापर करुन रुळावरुन घसरलेले डबे दूर करण्याचा प्रयत्न केला. सध्या या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. अपघाताचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. रेल्वेनं या अपघाताच्या चौकशीचं आदेश दिले असून अपघाताचं कारण तपासण्याचं काम सुरु आहे.
रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत :
या अपघातामुळं रिंगास-श्रीमाधोपूर कॉरिडॉरवरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अनेक गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. तर काही रेल्वे पर्यायी मार्गांवर वळवण्यात आल्या आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ट्रॅकवरुन ढिगारा काढण्यासाठी काही तास लागू शकतात. त्यानंतर दुरुस्तीचं काम सुरु होईल. स्थानिक प्रशासनदेखील घटनास्थळी पोहोचले असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. सध्या, रेल्वेनं प्रवाशांना आणि नागरिकांना अफवांकडे दुर्लक्ष करून फक्त अधिकृत माहितीवर अवलंबून राहण्याचं आवाहन केलं आहे. अपघातानंतर संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण आहे.