Spain Train Accident : स्पेनमध्ये एक मोठा रेल्वे अपघात झाला. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, रविवारी दक्षिण स्पेनमध्ये एक हाय-स्पीड ट्रेन रुळावरुन घसरली. रुळावरून घसरल्यानंतर, ट्रेन दुसऱ्या ट्रॅकवर गेली आणि समोरुन येणाऱ्या दुसऱ्या ट्रेनशी धडकली. या दुःखद अपघातात किमान 21 जणांचा मृत्यू झाला आणि डझनभर जखमी झाले. रेल्वे ऑपरेटर एडीआयएफच्या मते, मालागा आणि माद्रिद दरम्यान धावणारी ही ट्रेन कॉर्डोबाजवळ रुळावरुन घसरली आणि माद्रिदहून दक्षिण स्पेनमधील दुसऱ्या शहर हुएल्वाला जाणाऱ्या ट्रेनशी धडकली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही ट्रेनमध्ये अंदाजे 500 प्रवासी होते.
मृत्यूंची संख्या वाढण्याची शक्यता :
ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या अँडालुसिया प्रदेशाचे प्रादेशिक आरोग्य मंत्री अँटोनियो सेन्झ यांनी सांगितलं की, अधिकाऱ्यांनी त्यांना मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितलं की, बचावकार्य सुरु आहे आणि 73 जखमी प्रवाशांना उपचारासाठी सहा वेगवेगळ्या रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. त्यांनी असंही सांगितलं की, अपघातादरम्यान किमान एक प्रवासी डबा 4 मीटर उतारावरून खाली कोसळला.
स्थानिकांनी केली मदत :
कॉर्डोबाचे अग्निशमन प्रमुख फ्रान्सिस्को कार्मोना यांनी स्पॅनिश राष्ट्रीय रेडिओ स्टेशन आरएनईला सांगितलं की या अपघातात एका ट्रेनचं मोठं नुकसान झालं आहे. किमान चार डबे रुळावरुन घसरले आहेत. सॅन्झ म्हणाले की अपघातस्थळी परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. नागरी संरक्षण प्रमुख मारिया बेलेन मोया रोजास म्हणाले की हा अपघात पोहोचण्यास कठीण असलेल्या भागात झाला. त्यांनी सांगितलं की स्थानिकांनी पीडितांना मदत करण्यासाठी ब्लँकेट आणि पाणी घटनास्थळी आणलं होतं.
युरोपियन कमिशनच्या अध्यक्षांनी व्यक्त केला शोक :
रेल्वे ऑपरेटर एडीआयएफनं सांगितलं की माद्रिद आणि अंडालुसिया दरम्यानची रेल्वे सेवा सोमवारी धावणार नाही. स्पेनमध्ये हाय-स्पीड ट्रेन हा एक चांगला प्रवास पर्याय मानला जातो आणि त्या खूप लोकप्रिय आहेत. दरम्यान, अपघातानंतर स्पॅनिश लष्करी आपत्कालीन मदत युनिट्स आणि इतर बचाव युनिट्स तैनात करण्यात आल्या आहेत. रेड क्रॉसनं आरोग्य अधिकाऱ्यांनाही मदत पुरवली आहे. युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन यांनी इंस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की त्या कॉर्डोबातील भयानक घटनेवर लक्ष ठेवून आहेत.











