PM Modi Slovakia Visit: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या स्लोव्हाकियाच्या अधिकृत दौऱ्यावर असून या भेटीला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. भारतीय पंतप्रधानांची स्लोव्हाकियाला झालेली ही पहिलीच अधिकृत भेट ठरली आहे. या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमधील संबंध अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला.
ब्रातिस्लावा येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्लोव्हाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्यात प्रतिनिधीस्तरावरील चर्चा झाली. या चर्चेनंतर सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आणि संयुक्त पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष अभिनंदन
या पत्रकार परिषदेत रॉबर्ट फिको यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष अभिनंदन केले. भारताचे सर्वाधिक काळ सेवा देणारे पंतप्रधान म्हणून मोदी यांचा कार्यकाळ हा उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या नेतृत्वाची तुलना “राजकीय चमत्काराशी” केली जात असल्याचेही फिको यांनी नमूद केले.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनीही रॉबर्ट फिको यांचे आभार मानले आणि त्यांना भारताचा विश्वासू मित्र आणि अनुभवी नेता असे संबोधले. दोन्ही देशांनी आपल्या संबंधांना “सर्वसमावेशक भागीदारी” या नव्या दर्जावर नेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारत आणि स्लोव्हाकिया यांच्यातील मैत्री
मोदी यांनी सांगितले की, भारत आणि स्लोव्हाकिया यांच्यातील मैत्री, परस्पर विश्वास आणि समान प्राधान्यक्रम यामुळे संबंधांना नवी गती मिळत आहे. तसेच सांस्कृतिक संबंध हे दोन्ही देशांतील नात्याचा मजबूत पाया असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
उपनीषदांचे स्लोव्हाक भाषेत झालेले भाषांतर हे दोन्ही देशांतील सांस्कृतिक जवळीकतेचे उत्तम उदाहरण असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच स्लोव्हाकियातील भारतीय समुदाय देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचेही त्यांनी सांगितले.
अवकाश, संरक्षण आणि नागरी अणुऊर्जा या क्षेत्रांमध्ये भारत आणि स्लोव्हाकिया यांच्यात सहकार्य वाढवण्यासाठी मोठ्या संधी असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले. या भेटीमुळे दोन्ही देशांच्या संबंधांना भविष्यात अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.










