Sant Tukaram Maharaj Beej : वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत संत तुकाराम महाराज यांच्या ३७८ व्या बीज सोहळ्यानिमित्त श्रीक्षेत्र देहू नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. उद्या हा सोहळा लाखो वारकरी भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक धार्मिक विधींनी पार पडणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो वारकरी देहूत दाखल झाले असून संपूर्ण नगरी ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे.
हेही वाचा – “बाप कशाला काढता…”, विधानभवनात हायव्होलटेज ड्रामा, दोन आमदार एकमेकांना भिडले
गोपाळपुरा येथील वैकुंठ गमन स्थळी वारकरी भाविक मोठ्या संख्येने विसावा घेत असून उद्या याच ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमन सोहळ्याचा मुख्य धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे. वारकरी अभंग, कीर्तन, भजन आणि नामसंकीर्तनाच्या माध्यमातून भक्तिरसात तल्लीन झाले असून देहू नगरीत सर्वत्र आध्यात्मिक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
सोहळ्यानिमित्त मंदिर प्रशासन, ग्रामपंचायत आणि स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, निवास, वाहतूक नियोजन तसेच पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे नियोजन अंतिम टप्प्यात पोहोचले असून भाविकांच्या सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा बीज सोहळा भक्ती, श्रद्धा आणि समतेचा संदेश देणारा मानला जातो. त्यामुळे उद्या होणाऱ्या या भव्य सोहळ्याकडे संपूर्ण वारकरी संप्रदायाचे लक्ष लागले असून देहू नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली आहे.






