Solapur Tandulwadi Accident News: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात रविवारी एक हृदयद्रावक अपघात घडला. म्हसवड- पंढरपूर मार्गावरील तांदुळवाडी परिसरात भाविकांना घेऊन जाणारी पिकअप गाडी रस्त्यावरील नियंत्रण गमावून विहिरीत कोसळली. या दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
मृत व्यक्ती पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. हे सर्वजण म्हसवड येथील सिद्धनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करून परतीच्या प्रवासात असताना त्यांच्या वाहनाला हा अपघात झाला.
हेही वाचा: बहुप्रतिक्षित भारत विरूद्ध पाक सामना थोड्याच वेळात, कोण मारणार बाजी?
अपघाताची नेमकी घटना
प्राथमिक माहितीनुसार, तांदुळवाडी गावाजवळील रस्त्यावरून जात असताना पिकअप चालकाने वाहनावरील नियंत्रण सुटले . त्यानंतर वाहन थेट रस्त्यालगत असलेल्या विहिरीत जाऊन पडले. वाहनात मोठ्या संख्येने प्रवासी असल्याने बचावकार्य अधिक कठीण झाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, पोलीस आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. विहिरीत पडलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्यात आले. काही जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले, तर काहींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
कुटुंबीयांवर शोककाळा
मिळालेल्या माहितीनुसार, रांजणी येथील एका कुटुंबाने शाळा सुरू होण्यापूर्वी नातेवाईक आणि मुलांना कुलदैवताच्या दर्शनासाठी नेण्याचे नियोजन केले होते. दर्शन आटोपून सर्वजण परतीच्या मार्गावर असताना ही दुर्घटना घडली. त्यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह
अपघात झालेल्या विहिरीला संरक्षणात्मक कठडा नसल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे. विहीर मालकाने यापूर्वी संबंधित विभागाकडे वारंवार मागणी करूनही आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
चौकशीचे आदेश
जिल्हा प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अपघातास कारणीभूत ठरलेल्या सर्व बाबींची तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच रस्त्यालगत असलेल्या विहिरींचा सर्वेक्षण करून त्याठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.
दोषींवर कारवाईची मागणी
या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी रस्ते बांधकामाशी संबंधित यंत्रणा, ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी रस्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने हाताळण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.









