Shreyas Iyer injury update : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी वनडे सामन्यात गंभीर दुखापत झाली. श्रेयस सध्या सिडनी येथील रुग्णालयात दाखल आहे आणि तो आयसीयूमध्ये (इंटेन्सिव्ह केअर युनिट) आहे. ऑस्ट्रेलियन यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरीचा शानदार झेल घेताना त्याला दुखापत झाली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) श्रेयस अय्यरच्या प्रकृतीबद्दलची ताजी माहिती शेअर केली आहे.
काय म्हणालं बीसीसीआय :
बीसीसीआयच्या निवेदनात असं म्हटलं आहे की, “25 ऑक्टोबर रोजी सिडनी इथं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात क्षेत्ररक्षण करताना श्रेयस अय्यरला डाव्या बरगडीच्या खालच्या भागात दुखापत झाली होती. त्याला अधिक तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आलं होतं. स्कॅनमध्ये त्याच्या प्लीहाला जखम झाल्याचं दिसून आलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत, त्याची प्रकृती स्थिर आहे आणि तो बरा होत आहे. बीसीसीआयची वैद्यकीय टीम सिडनी आणि भारतातील तज्ञांशी सल्लामसलत करुन त्याच्या दुखापतीचं बारकाईनं निरीक्षण करत आहे.” भारतीय संघाचे डॉक्टर सिडनीमध्ये श्रेयससोबत राहतील आणि त्याच्या दैनंदिन प्रगतीचं मूल्यांकन करतील, असंही बीसीसीआयनं सांगितलं आहे.
Medical update on Shreyas Iyer. Details 🔽 #TeamIndia | #AUSvIND https://t.co/8LTbv7G1xy
— BCCI (@BCCI) October 27, 2025
एक आठवडा राहणार रुग्णालयात :
दरम्यान वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, श्रेयस अय्यर एक आठवडा सिडनी येथील रुग्णालयात राहील आणि त्याच्या अनुपस्थितीचा कालावधी पुढील काही दिवसांत निश्चित केला जाईल. मात्र बीसीसीआयनं अद्याप त्याच्या पुनरागमनाचा कालावधी निश्चित केलेला नाही. ही दुखापत टीम इंडियासाठी एक मोठा धक्का मानली जाते, कारण तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता. पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात श्रेयस अय्यरनं 11 धावा केल्या. त्यानंतर अॅडलेड वनडे सामन्यात त्यानं शानदार 61 धावा केल्या. त्यानंतर, सिडनी वनडे सामन्यादरम्यान अॅलेक्स कॅरीचा झेल घेताना श्रेयसला गंभीर दुखापत झाली, ज्यामुळं त्याला मैदान सोडावं लागलं.
हे हि वाचा : Ranji Trophy Record Broken : रणजी ट्रॉफी 63 वर्षांचा जुना विक्रम मोडला; फक्त 90 षटकांत संपला सामना
श्रेयस अय्यरची कारकिर्द Shreyas Iyer injury update
श्रेयस अय्यरनं भारतीय संघासाठी 14 कसोटी, 73 वनडे सामने आणि 51 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या काळात त्यानं 40.60 च्या सरासरीनं 4,832 धावा केल्या, ज्यामध्ये सहा शतकं आणि 36 अर्धशतकं आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान 30 वर्षीय श्रेयसला वनडे क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं उपकर्णधारपद देण्यात आलं












