गुवाहाटी : 30 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी रविवारी, 23 नोव्हेंबर रोजी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या वनडे मालिकेत केएल राहुल भारतीय संघाचं नेतृत्व करेल. नियमित कर्णधार शुभमन गिल मानेच्या दुखापतीमुळं निवडीसाठी उपलब्ध नव्हता, तर श्रेयस अय्यरही दुखापतीमुळे काही महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. त्यामुळंच यष्टीरक्षक-फलंदाज राहुलवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
चार खेळाडूंना संघात स्थान :
भारतीय संघानं गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशी शेवटची वनडे मालिका खेळली होती. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं तीन सामन्यांची वनडे मालिका 1-2 अशी गमावली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडे संघाचा भाग असलेले चार खेळाडू दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेत सहभागी होणार नाहीत. यामध्ये शुभमन गिल, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे. शुभमन आणि श्रेयस दुखापतीमुळं मालिकेला मुकणार होते. वर्कलोड व्यवस्थापनाचा भाग म्हणून वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला विश्रांती देण्यात आली आहे. डावखुरा अष्टपैलू अक्षर पटेलला वगळण्यात आलं आहे.
दीर्घ प्रतीक्षेनंतर ऋतुराज आणि तिलकचं संघात पुनरागमन :
या चौघांच्या जागी ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, रवींद्र जडेजा आणि ऋषभ पंत यांची वनडे संघात निवड करण्यात आली आहे. ऋतुराजनं भारतासाठी शेवटचा वनडे सामना 19 डिसेंबर 2023 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गकेबरहा इथं खेळला होता. तिलक वर्मानं 21 डिसेंबर 2023 रोजी पर्ल इथं त्याच संघाविरुद्ध शेवटचा वनडे सामना खेळला होता. आता, दोन्ही खेळाडू जवळजवळ दोन वर्षांनी वनडे संघात परतले आहेत.
हे ही वाचा : ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये लक्ष्य सेनचा जलवा; जपानच्या खेळाडूचा पराभव करत जिंकली स्पर्धा
चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर पंत पहिल्यांदाच वनडे संघात :
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नंतर पहिल्यांदाच ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांचा भारताच्या वनडे संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, पंतला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. पंतची दुसऱ्या पसंतीचा यष्टीरक्षक म्हणून वनडे संघात निवड करण्यात आली आहे. पंतनं शेवटचा वनडे सामना 7 ऑगस्ट 2024 रोजी कोलंबो इथं श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात निवडलेले उर्वरित 11 खेळाडू देखील ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेचा भाग होते.
12 सामन्यांता राहुलनं केलं नेतृत्व :
केएल राहुलसाठी कर्णधारपद काही नवीन नाही. राहुलनं यापूर्वी वनडे आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. राहुलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं 12 पैकी आठ वनडे सामने जिंकले, तर चार गमावले.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ :
केएल राहुल (कर्णधार/विकेटकीपर), रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग आणि ध्रुव जुरेल












