India vs Australia 2nd T20 : भारत आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना शुक्रवार, 31 ऑक्टोबर रोजी मेलबर्नमधील मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (एमसीजी) इथं खेळवण्यात आला. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं चार विकेट्सनं विजय मिळवला. ऑस्ट्रेलियासमोर 126 धावांचं लक्ष्य होतं, जे त्यांनी 14व्या षटकात पूर्ण केलं. या विजयासह ऑस्ट्रेलियाने टी-20 मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. मालिकेतील तिसरा सामना 2 नोव्हेंबर रोजी होबार्ट इथं होणार आहे.
टीम इंडियाची विजयी मालिका खंडित :
मेलबर्नमधील पराभवासह, भारताची टी-20 क्रिकेटमधील विजयी मालिकाही खंडित झाली. या सामन्यापूर्वी भारतानं दहापैकी नऊ टी-20 सामने जिंकले होते, तर एक सामना अनिर्णित राहिला होता. शिवाय, 2008 नंतर या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा हा पहिलाच टी-20 पराभव होता. कॅनबेरा इथं झालेल्या टी-20 मालिकेतील पहिला सामना पावसामुळं वाया गेला होता हे लक्षात घ्यावं.
Australia’s impressive bowling performance secured their victory over India in Melbourne 👊#AUSvIND 📝: https://t.co/JPvGg1jQQu pic.twitter.com/xmNHprTqWv
— ICC (@ICC) October 31, 2025
ऑस्ट्रेलियाची दमदार सुरुवात :
लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात आक्रमक झाली. ट्रॅव्हिस हेड आणि मिशेल मार्श यांनी पहिल्या विकेटसाठी 51 धावा जोडल्या. हेडनं 15 चेंडूत 28 धावा केल्या, त्यात तीन चौकार आणि एक षटकार मारला. मार्शनं 26 चेंडूत 46 धावा केल्या, ज्यात दोन चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. शेवटी बुमराहनं दोन विकेट घेतल्या मात्र तोपर्यंत सामना भारताच्या हातून निसटला होता.
दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड कसा (India vs Australia 2nd T20)
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात आतापर्यंत एकूण 33 टी-20 सामने झाले आहेत. या सामन्यांमध्ये भारतीय संघानं वरचढ कामगिरी केली आहे, त्यापैकी 20 सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियानं फक्त 11 वेळा भारताला पराभूत केलं आहे, तर दोन सामने निकालाविना संपले आहेत. दोन्ही संघांमधील प्रत्येक सामना रोमांचक राहिला आहे, परंतु आकडेवारीवरुन असं दिसून येतं की भारत टी-20 स्वरुपात ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवत आहे.











