मुंबई IND vs WI Test Series : भारतीय क्रिकेट संघ 2 ऑक्टोबरपासून वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चौथ्या आवृत्तीत पुढील मालिका खेळणार आहे. या कसोटी मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघाची घोषणा आधीच करण्यात आली आहे, तर बीसीसीआयनंही आता टीम इंडियाचा संघही जाहीर केला आहे, ज्यामध्ये कर्णधार म्हणून शुभमन गिल आणि जसप्रीत बुमराहचाही समावेश आहे. करुण नायरचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे या मालिकेसाठी रवींद्र जडेजाला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आलं आहे.
कोणत्या खेळाडूंना संघात स्थान :
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी जाहीर झालेल्या टीम इंडियाच्या संघाबद्दल बोलायचं झालं तर, इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघातून वगळण्यात आलेला डावखुरा फलंदाज देवदत्त पडिक्कलचं पुनरागमन झालं आहे. दीर्घकाळ अनुपस्थितीनंतर भारतीय कसोटी संघात परतलेला करुण नायर इंग्लंड दौऱ्यातील खराब कामगिरीमुळं वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात समाविष्ट करण्यात आलेला नाही. तसंच इंग्लंड दौऱ्यादरम्यान दुखापत झालेला टीम इंडियाचा प्रमुख यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत अद्याप या मालिकेसाठी पूर्णपणे बरा झालेला नाही. ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत, ओव्हल कसोटीपूर्वी टीम इंडियाच्या संघात समाविष्ट झालेल्या नारायण जगदीशनला ध्रुव जुरेलसह संघात दुसरा यष्टीरक्षक म्हणून समाविष्ट करण्यात आलं आहे. याव्यतिरिक्त, आकाश दीपला या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघात समाविष्ट करण्यात आलेलं नाही.
रवींद्र जडेजाची उपकर्णधारपदी नियुक्ती :
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाचा अनुभवी फिरकीपटू रवींद्र जडेजा याची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. फिरकी गोलंदाजीमध्ये वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांचा समावेश आहे. वेगवान गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा समावेश आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी 15 सदस्यीय संघ :
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिककल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नीतीश कुमार रेड्डी, एन जगदीशन (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव.