नवी दिल्ली : जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या नवीन अध्यक्षांचं नाव 28 सप्टेंबर रोजी जाहीर केलं जाईल, याच दिवशी बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. सध्या सर्वांच्या नजरा बीसीसीआयच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती होणार याकडे लागल्या आहेत. अशातच शनिवारी दिल्लीत झालेल्या एका बैठकीत बीसीसीआयचे उच्च अधिकारी उपस्थित होते. यात नवीन अध्यक्षपदासाठी मिथुन मन्हास यांच्या नावावर जवळजवळ सर्वांचं एकमत झालं आहे. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेची ही 94वी बैठक असेल.
मिथुन मन्हास यांची नियुक्ती जवळजवळ निश्चित :
आतापर्यंत सौरव गांगुलीचा कार्यकाळ संपल्यानंतर रॉजर बिन्नी यांनी अध्यक्षपद भूषवलं होतं. आता, त्यांचा कार्यकाळ संपत असल्यानं नवीन दुरुस्तीनुसार वयाच्या 70व्या वर्षी त्यांना पद सोडावं लागत आहे. वृत्तसंस्था पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या पुढील अध्यक्षपदी मिथुन मन्हास यांची नियुक्ती करण्यास सर्वांनी सहमती दर्शविली आहे. अध्यक्षपदी मन्हास यांची निवड आश्चर्यकारक आहे, कारण त्यांनी कधीही भारतीय संघासाठी एकही सामना खेळलेला नाही. तसंच देवजीत साकिया सचिवपदी कायम राहतील, तर राजीव शुक्ला उपाध्यक्षपदाची भूमिका सांभाळतील. रॉजर बिन्नी यांनी बीसीसीआय अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शुक्ला यांची कार्यवाहक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मिथुन मन्हास यांची क्रिकेट कारकिर्द कशी? :
मिथुन मन्हास आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कधीही भारतीय संघाकडून खेळले नसले तरी त्यांना देशांतर्गत क्रिकेटमध्ये निश्चितच एक महान खेळाडू मानलं जातं. मिथुन मन्हास यांनी त्यांच्या कारकिर्दीत 157 प्रथम श्रेणी सामने खेळले ज्यात 27 शतकं आणि 49 अर्धशतकांसह 9714 धावा केल्या आहेत. मिथुन मन्हास यांनी गेल्या काही वर्षांपासून जम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशनचं प्रशासक म्हणून काम केलं आहे. तसंच त्यांनी आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स, पुणे वॉरियर्स आणि चेन्नई सुपर किंग्जसाठीही काम केलं आहे.
बीसीसीआयची नवीन टीम कशी असेल? :
नवीन रचनेत राजीव शुक्ला उपाध्यक्षपदी, रघुराम भट्ट कोषाध्यक्षपदी, प्रभतेज भाटिया संयुक्त सचिवपदी आणि अरुण धुमल आयपीएल अध्यक्षपदी राहतील असा दावा अहवालात करण्यात आला आहे. तर देवजीत सैकिया पूर्वीप्रमाणेच सचिवपदी राहतील.