Kulbhushan Jadhav in Pakistan Jail : साताऱ्यात जन्म झालेले कुलभूषण जाधव नेमके पाकिस्तानच्या जेलमध्ये काय करतायत? ते तिथंपर्यंत कसे पोहोचले आणि कसे अडकले? आणि आता त्यांची सुटका होणार की नाही? सरबजित सिंहप्रमाणे पाकिस्तान कुलभूषण जाधव यांचाही घात करु शकतं का? एका मराठमोळ्या माणसाची पाकिस्तानातील ही लढाई या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत…
एका पॉडकास्टचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल
धुरंधरचा जसकीरत, उझैर बलोच आणि कुलभूषण जाधव हे सगळं एका व्हायरल क्लिपमुळे पुन्हा चर्चेत आलेलं आंतरराष्ट्रीय गूढ आहे. सोशल मीडियावर सध्या एका पॉडकास्टचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये विचारलेला एक प्रश्न आणि त्यावर मिळालेले उत्तर यामुळे पुन्हा एकदा एका अशा नावाचा उल्लेख झाला आहे, ज्याने २०१६ मध्ये संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. तो प्रश्न होता— “धुरंधर चित्रपटात जसकीरत सिंग रांगीने साकारलेलं पात्र खऱ्या आयुष्यात कोणासारखं होतं?” आणि उत्तर मिळालं— “कुलभूषण जाधव.” साताऱ्याचा हा माणूस, जो आजही पाकिस्तानच्या जेलमध्ये बंद आहे.
‘दहशतवादी’ कारवायांच्या आरोपाखाली अटक
कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी आहेत. मूळचे महाराष्ट्रातील सांगली-सातारा पट्ट्यातील असलेले जाधव मुंबईत वास्तव्यास होते. निवृत्तीनंतर त्यांनी इराणमधील चाबहार बंदरातून आपला स्वतःचा कार्गो व्यवसाय सुरू केला होता. मात्र, ३ मार्च २०१६ रोजी पाकिस्तानने दावा केला की त्यांनी जाधव यांना बलुचिस्तान प्रांतातून ‘हेरगिरी’ आणि ‘दहशतवादी’ कारवायांच्या आरोपाखाली अटक केली आहे.
जाधव यांचा इराणमधून अपहरण – भारत सरकार
भारताने पाकिस्तानचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. भारताच्या म्हणण्यानुसार, जाधव यांचा इराणमधून अपहरण करण्यात आले आणि त्यांना बळजबरीने पाकिस्तानात नेऊन हेरगिरीच्या खोट्या आरोपात अडकवण्यात आले.
तेव्हा कुलभूषण जाधव यांचे नाव समोर
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर’ या चित्रपटाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. यातील जसकीरत सिंग रांगीची भूमिका एका अशा तपासावर आधारित आहे, जो पाकिस्तानच्या अंडरवर्ल्ड आणि हेरगिरीच्या जाळ्याशी जोडलेला आहे. पॉडकास्टमध्ये जेव्हा विचारण्यात आले की हे पात्र खऱ्या आयुष्यात कोणाशी मिळतेजुळते आहे, तेव्हा कुलभूषण जाधव यांचे नाव समोर आले.
२०१६ साली व्हायरल झालेला जाधव यांचा तो फोटो
विशेषतः २०१६ साली व्हायरल झालेला जाधव यांचा तो फोटो, ज्यामध्ये त्यांचे केस बारीक कापलेले होते, नजर शून्यात होती पण तरीही ती भेदक होती, त्याची तुलना चित्रपटातील दृश्यांशी केली जात आहे. “लंबा जायेगा” हे वाक्य आणि जाधव यांची ती स्थिर नजर आजही अनेकांच्या स्मरणात आहे.
उझैर बलोच ‘लयारी गँग’चा कुख्यात गँगस्टर
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा आणि तितकाच गुंतागुंतीचा भाग म्हणजे ‘उझैर बलोच’. उझैर बलोच हा कराचीमधील ‘लयारी गँग’चा कुख्यात गँगस्टर आणि डॉन होता. पाकिस्तानच्या लष्करी तपास यंत्रणांनी असा दावा केला होता की, कुलभूषण जाधव यांचे उझैर बलोचशी संबंध होते.
जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली
पाकिस्तानच्या मते, जाधव यांनी बलोचच्या माध्यमातून पाकिस्तानात अस्थिरता पसरवण्याचे काम केले. मात्र, हे केवळ भारताला बदनाम करण्यासाठी पाकिस्तानने रचलेले एक षडयंत्र होते. उझैर बलोचला २०१६ मध्ये अटक झाल्यानंतर त्याने दिलेल्या जबानीचा वापर करून जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती
१० एप्रिल २०१७ रोजी पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली. या निर्णयामुळे भारतात संतापाची लाट उसळली. भारताने तातडीने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली. १७ जुलै २०१९ हा दिवस भारतासाठी मोठा विजयाचा ठरला. जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली. पाकिस्तानने ‘व्हिएन्ना करारा’चे उल्लंघन केल्याचे ताशेरे ओढले. भारताला ‘कॉन्सुलर ॲक्सेस’ म्हणजेच जाधव यांना भेटण्याची परवानगी देण्याचे आदेश दिले. तसेच पाकिस्तानला आपल्या निर्णयाचा प्रभावीपणे पुनर्विचार करण्यास सांगितले.
कुलभूषण जाधव अद्याप पाकिस्तानच्या जेलमध्ये
आज २०२६ उजाडले असले तरी कुलभूषण जाधव अद्याप पाकिस्तानच्या जेलमध्ये आहेत. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या दबावापोटी त्यांना काही वेळा भारतीय राजनैतिक अधिकार्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेटू दिले, पण त्यांची सुटका अद्याप झालेली नाही. पाकिस्तान सरकार सातत्याने या प्रकरणाचे राजकारण करत आले आहे. भारताकडून सातत्याने हे स्पष्ट केले जात आहे की, जाधव हे निर्दोष असून त्यांचे अपहरण करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आजही जाधव यांच्या सुटकेसाठी कायदेशीर आणि राजनैतिक मार्गाने प्रयत्न करत आहे.
कुलभूषण जाधव यांची सुटका कधी होईल
पॉडकास्टच्या त्या एका क्लिपमुळे कुलभूषण जाधव यांचे नाव पुन्हा एकदा लोकांच्या चर्चेत आले आहे. ‘धुरंधर’ सारख्या चित्रपटांच्या माध्यमातून जेव्हा अशा संवेदनशील विषयांना हात घातला जातो, तेव्हा समाजाला पुन्हा एकदा त्या संघर्षाची आठवण करून दिली जाते, जो एक भारतीय अधिकारी आजही परकीय भूमीवर एकाकी लढत आहे. कुलभूषण जाधव यांची सुटका कधी होईल, हे अद्याप अनुत्तरित असले तरी, त्यांच्यासाठी सुरु असलेला लढा प्रत्येक भारतीयासाठी अस्मितेचा विषय बनला आहे.












