200 flights canceled : इंडिगो एअरलाईन्सने आपली २०० हून अधिक उड्डाणे अचानक रद्द केल्याने त्याचा हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मुंबईहून दिल्लीला जाणारी इंडिगोची अनेक विमाने रद्द असल्याने त्याचा हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी इंडिगोला या ऑपरेशन संकटाची कारणे आणि त्यावरील उपाययोजनांचे सविस्तर स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी काही विमानतळांवर कर्मचार्यांची कमतरता देखील दिसून आल्याचे समोर आले आहे.
देशातील आघाडीच्या विमान कंपन्यांपैकी एक असलेल्या इंडिगोने दोन दिवसांत आपल्या २०० हून अधिक विमानांची उड्डाणे अचानक रद्द केली आहे. त्यामुळे देशभरातील विमानसेवांवर मोठा परिणाम झाला असून त्याचा हजारो प्रवाशांना त्याचा फटका बसला आहे. मुंबईसह दिल्ली, हैदराबाद बंगळुरू आणि अहमदाबाद यांसारख्या मोठ्या विमानतळांवर अनेक प्रवासी अडकून पडल्याचे पाहायला मिळत आहे. अनपेक्षित आणि एकत्रित आलेल्या अनेक कारणांमुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे इंडिगोचे म्हणणे आहे. भारताच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
हेही वाचा – मोठा निर्णय! प्रधानमंत्री कार्यालयाच्या नावात बदल, ‘सेवा तीर्थ’ देण्याचा ‘हा’ आहे महत्त्वाचा उद्देश
मुंबईच्या विमानतळावरून ५० हून अधिक विमानांची उड्डाणे रद्द..
इंडिगो कंपनीने मंगळवारी आपल्या १०० हून अधिक विमानांचे उड्डाण थांबवण्याचा निर्णय घेतला. विशेष बाब म्हणजे- सोमवारीही इंडिगोने १०० हून अधिक विमानांची उड्डाणे रद्द केली होती. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुमारे तीन डझन उड्डाणे रद्द करण्यात आली, तर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इंडिगोच्या ५० हून अधिक विमानांची उड्डाणे थांबवण्यात आली. त्याशिवाय हैदराबादमधून जवळपास दोन डझन आणि अहमदाबाद येथून किमान १४ विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आल्याची माहिती आहे.
वर्षाला १ हजार तास ड्युटीची वेळ निश्चित
फ्लाइट ड्यूटी टाइम लिमिटेशनच्या नियमांची अंमलबजावणी झाल्यापासून वैमानिकांसह कर्मचार्यांच्या ड्युटी तासांचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. नवीन नियमांनुसार प्रतिदिन ८ तास, आठवड्याला ३५ तास, महिन्याला १२५ तास आणि वर्षाला १ हजार तास एवढीच ड्युटी वेळ निश्चित करण्यात आली आहे. दिल्लीत उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर हे नियम लागू करण्यात आले. बुधवारी अनेक विमानतळांवरील चेक-इन प्रणाली ठप्प पडल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली होती. सिस्टिम फेल झाल्यामुळे एअरलाइन्सना मॅन्युअल प्रक्रिया वापरावी लागली. परिणामी विमानांचा विलंब वाढत गेल्याने इंडिगोला अनेक उड्डाणे रद्द करावी लागली.












