Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) भोंदू ज्योतिषी अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) तपासात एका मागून एक खरातचे कारनामे समोर येताना दिसत आहेत. खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. तसेच त्याने अनेकांची आर्थिक फसवणूक देखील केली आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी (Nashik Police) त्याला बेड्या ठोकल्या आहेत. तर हे प्रकरण समोर आल्यानंतर अनेक पीडित महिला धैर्याने पुढे येत खरातविरोधात तक्रार दाखल करताना दिसत आहेत. अशातच आता खरातचा आणखी एक धक्कादायक कारनामा समोर आला आहे.
हेही वाचा – दिल्लीच्या राजकारणात खळबळ! खासदार राघव चड्ढांना आम आदमी पार्टीकडून मोठा झटका
4 वर्षांपूर्वी घडलेलं ते प्रकरण नेमकं काय आहे?
अशोक खरातचा 4 वर्षांपूर्वीचा एक धक्कादायक कारनामा आता उघडकीस आला आहे. खरातच्या जाचाला कंटाळून शिर्डी येथील विकास रामदास दिवटे या तरूणाने आत्महत्या केली होती. आश्चर्यचकीत करणारी बाब म्हणजे, पुरावे असताना देखील पोलिसांनी खरातला क्लिन चीट दिली होती, असा गंभीर आरोप मृत विकास दिवटेच्या कुटुंबीयांनी केला आहे.
विकास दिवटे या तरूणाने 5 जून 2022 रोजी सुसाइड नोट लिहित 9 जून रोजी आत्महत्या करत त्याने आपले जीवन संपवले होते. “मी विकास रामदास दिवटे फाशी घेऊन मरत आहे. माझ्या मरणास नाशिक कॅप्टन अशोक खरात आणि माझी सासूरवाडी जबाबदर आहे. मला अशोक खरातने फोनवर धमकी दिली होती. तसेच माझ्या मोबाईलमध्ये सर्व कॉल रेकॉर्डिंग आहेत. त्यामुळे मी मेल्यावर खरातवर कारवाई करण्यात यावी”, असं मृत विकासने सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं.
विकासने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अशोक खरातच्या नावाचा स्पष्ट उल्लेख केलेला दिसत आहे. मात्र, चार्टशीटमधून खरातचं नाव गायब करून त्याला क्लिनचिट कशी दिली? असा सवाल मृत विकासचा भाऊ राजेंद्र दिवटे यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, अशोक खरात हा आता चांगलाच अडचणीत सापडला असून नवीन प्रकरणांसोबत अनेक जुनी प्रकरणे देखील समोर येऊ लागली आहेत. तसेच आता विकास दिवटे आत्महत्या प्रकरणाचा फेरतपास करण्याची मागणी केली जात आहे.












