Suryakumar Yadav | भारतीय संघाने न्यूझीलंड संघाला (IND vs NZ) धूळ चारत 2026 च्या टी-20 विश्वचषक (T-20 World Cup 2026) ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. भारतीय संघानं दमदार अशी कामगिरी करत मोठा विजय मिळवला आहे.अंतिम सामन्यात भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत पाच गडी गमावून 255 धावा केल्या. तर दुसरीकडे न्यूझीलंड संघ 19 षटकांत 159 धावा करून सर्वबाद झाला. विशेष म्हणजे टी-20 विश्वचषक फायनलमध्ये भारतीय संघानं सर्वाधिक धावा करत मोठा इतिहास रचला आहे.
हेही वाचा – T20 विश्वचषकात संजू सॅमसनचा जलवा; बनला T20 विश्वचषकाचा नवा सिक्सर किंग
भारतीय संघ हा सलग दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकणारा पहिला संघ ठरला आहे. तसेच सर्वाधिक वेळा टी-20 विश्वचषक जिंकणारा संघही भारतीय संघ ठरला आहे. याआधी 2007 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वाखाली भारतीय संघ पहिल्यांदा विजयी ठरला होता. त्यानंतर 2024 मध्ये रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय संघानं टी-20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. तर आता सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली भारतीय संघानं पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
भारतीय संघाचे पुढचे मिशन कोणते?
भारतीय संघाला विजेतेपद पटकवून देण्यात कर्णधार सूर्यकुमार यादवचा मोलाचा वाटा आहे. विशेष म्हणजे सूर्यकुमार यादवचे हे पहिलेच आयसीसी विजेतेपद आहे. तर आता 2026 च्या टी-20 विश्वचषक ट्रॉफीवर आपले नाव कोरल्यानंतर भारतीय संघाचे पुढचे मिशन कोणते? याबाबत सूर्यकुमार यादवने मोठा खुलासा केला आहे.
टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवने आपल्या पुढच्या लक्ष्याबाबत माहिती दिली. भारतीय संघाचे पुढचे ध्येय ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकणे आहे, असा खुलासा सूर्यकुमार यादवने केला आहे.
अंतिम सामना पार पडल्यानंतर पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादव म्हणाला की, टी-20 विश्वचषकाचा हा प्रवास भारतीय संघासाठी खूप खास ठरला. स्पर्धेच्या सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये भारतीय संघानं अपेक्षेनुसार कामगिरी केली नाही, पण क्रिकेटमध्ये अशा गोष्टी होणं एक खेळाचा भाग आहेत. भारतीय संघ ज्या प्रकारे पुनरागमन करत या टप्प्यावर येऊन पोहोचला तो खरोखर खास क्षण आहे. आम्ही एक संघ म्हणून जे साध्य केलं आहे ते तुमच्या सर्वांसमोर आहे. आणि आम्हाला या गोष्टीचा खूप आनंद आहे. आता आमचे पुढचे ध्येय हे ऑलिंपिक सुवर्णपद आहे. आम्ही आता आमचे पुढचे ध्येय साध्य करण्यासाठी काम करू, असं सूर्यकुमार यादव म्हणाला.
दरम्यान, कालच्या सामन्यात भारतीय संघानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. टी-20 क्रिकेटच्या सुरूवातीपासूनच टीम इंडीयानं या फॉरमॅटवर वर्चस्व गाजवले आहे. आत्तापर्यंत भारतीय संघ हा 50 वेळा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 200 पेक्षा जास्त धावा करणारा संघ ठरला आहे. तर या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका हा संघ आहे. या संघाने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 29 वेळा 200 पेक्षा जास्त धावा करत इतिहास रचला आहे.










