Ajit Pawar Son Jay Pawar Wedding : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलांचे लग्न उद्या ५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलं आहे. मात्र, या लग्नाला अजित पवारांचे सख्खे बंधु श्रीनिवास पवार जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवारांचे धकटे सुपूत्र जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा ५ तारखेला बहरीन येथे आहे. या समारंभासाठी दोन्ही कुटुंबियांनी ४०० पाहुण्यांना आमंत्रित केलं आहे. मात्र, या लग्नात सर्वात जास्त चर्चा ही श्रीनिवास पवार लग्नाना जाणार नाहीत याची आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी बंगळुरू येते एका जवळच्या विवाह सोहळ्याला उपस्थिती लावणार आहेत. तर त्याचे चिरंजीव ज्यांचा नुकतेच लग्न झाले आहे ते युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी हे नवविवाहित जोडपं जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांच्या लग्नाला दस्तूर खुद्द अजित पवार उपस्थित होते. त्यामुळे अजित पवारांच्या मुलाच्या लग्नाला त्यांच्या सख्या भावाची गैरहजेरी सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनला आहे.
खासदार सुप्रिया सुळे लोकसभेच्या अधिवेशनात व्यस्त?
सध्या लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असल्या करणामुळे खासदार सुप्रिया सुळे या देखील लग्नाला जाण्याची शक्यता फार कमी आहे. तर शरद पवार यांना लांबचा प्रवास जमत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पवार कुटुंबातील कोण-कोण या लग्नाला जाणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. जय पवारच्या लग्नामुळे पवारांच्या कुटुंबातील भाउबंदकी समोर आली आहे. या लग्नाला शरद पवार, प्रतिभा पवार,सुप्रिया सुळे जाणार नसल्याचं समोर आलं आहे.
युगेंद्रच्या विवाह सोहळ्याला संपूर्ण पवार कुटुंबाची उपस्थित
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा भव्य विवाह सोहळा नुकताच ३० नोव्हेंबर रोजी मुंबईतील बीकेसी येथील जिओ सेंटर येथे पार पडला. युगेंद्र यांच्या विवाह सोहळ्याला पवार कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. या सोहळ्याला ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार, सुनेत्रा पवार, रोहित पवार, पार्थ पवार, जय पवार यांनी नव दांपत्याला शुभेच्छा दिल्या. युगेंद्र-तनिष्का यांचा विवाह हा सोहळा अत्यंत भव्य आणि दिमाखदार पद्धतीने पार पडला.
निमंत्रितांची संख्या मर्यादित ठेवण्यात आली
जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या लग्नसोहळ्याला फक्त ४०० पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. या लग्न समारंभासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून फक्त दोनच नेते निमंत्रित असल्याची माहिती समोर आली आहे. यात पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा समावेश आहे. पवार कुटुंबीयांचा मोठा सोहळा असला तरी निमंत्रितांची संख्या मर्यादित ठेवण्यात आली आहे. जय पवार यांच्या लग्नपत्रिकेनुसार बहरीनमध्ये चार दिवसांचे पारंपारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.












