Ashwini Bhide | नुकतीच एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईची (Mumbai) कमान आता महिला नेतृत्वाकडे सोपवण्यात आली आहे. मुंबई महिला महापालिकेच्या (BMC) आयुक्तपदी ‘मेट्रो वूमन’ (Metro Women) म्हणून ओळख असलेल्या अश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अश्विनी भिडे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम करत होत्या तर आता त्यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा – कुठलाही तोरा चालणार नाही…, मेंटॉस बाई म्हणत रूपाली ठोंबरेंचा रूपाली चाकणकरांवर हल्लाबोल, केली खोचक टीका
आज सामान्य प्रशासन विभागाने अश्विनी भिडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. तर सध्याचे मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी हे 31 मार्च 2026 रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. गगराणी यांच्या निवृत्तीनंतर मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
कोण आहेत अश्विनी भिडे?
मुंबई महापालिका आयुक्तपदासाठी अनेक नावे चर्चेत होती. यामध्ये असीम गुप्ता, मनीष वर्मा, संजय मुखर्जी, मिलिंद म्हैसकर अशा बड्या अधिकाऱ्यांची नावं आयुक्तपदासाठी चर्चेत होती. मात्र, ही सर्व नावं डावलत अश्विनी भिडे यांच्याकडे महापालिका आयुक्तपद सोपवण्यात आलं आहे. काल (30 मार्च) अश्विनी भिडे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज त्यांची मुंबई महापालिका आयुक्तपदासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अश्विनी भिडे या 1995 च्या तुकडीतील अधिकारी आहेत. तर आयुक्तपदासाठी चर्चेत असलेले अधिकारी हे 1990 ते 1994 मधील होते. मात्र तरीही या बड्या अधिकाऱ्यांना डावलत भिडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
अश्विनी भिडे या 1995 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहे. त्यांनी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती. मेट्रो प्रकल्पातील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांची ‘मेट्रो वुमन’ म्हणून ओळख आहे. तर आता त्यांच्या हाती मुंबई महापालिकेची सर्वोच्च जबाबदारी देण्यात आली असून त्या मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त ठरल्या आहेत.












