दौंड तालुक्यात एका युट्यूब चॅनलच्या पत्रकार आणि त्याच्या दोन मित्रांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या लगत असणाऱ्या दयानंद हॉटेल समोर ही घटना घडली असून याप्रकरणी दहा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील खडकी गावच्या हद्दीत दयानंद हॉटेलच्या समोर अवैध गॅस रिफीलिंगचे काम चालू असल्याचे समजल्यानंतर या घटनेची बातमी मिळवण्यासाठी महावीर वजाळे (रा.आकुंभे ता.माढा, जि.सोलापुर) हे पत्रकार त्याठिकाणी पोहचले. यावेळी त्यांच्या हातात पत्रकारितेचा बूम होता. हा बूम पाहिल्यानंतर या अवैध कारवाईतील सहकारी शेट्टी व शिंदे यांच्या सांगण्यावरून त्याठिकाणी हजर असलेल्या आठ ते दहा लोकांनी महावीर वजाळे आणि त्यांचे मित्र निखिल आरडे , श्रीकांत मासुळे यांना लोखंडी पाईप तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. या मारहाणीमध्ये त्या तिघांना गंभीर दुखापत झाली असून दोन बरगड्या मोडल्या असून त्यांच्यावर भिगवण येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात भारतीय न्याय संहिता कलम, 189 (2) (4),190,118 (2),118 (1),115(2) नुसार महावीर वजाळे यांच्या तक्रारीवरून दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस हे करीत आहेत.
याप्रकरणी विजय ज्ञानेश्वर पवार आणि विशाल भोलानाथ कांबळे या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती डीवायएसपी बापुराव दडस यांनी दिली आहे.