Bihar Chief Minister : बिहार विधानसभा निवडणूकीत एनडीए चा रेकाॅर्ड ब्रेक विजय झाला आहे. या निवडणूकीत एनडीए ने २०२ जागा जिंकल्या तर महागठबंधनला केवळ ३५ जागा मिळवता आल्या. त्यानंतर आता बिहारचा मुख्यमंत्री होणार? यावरून हालचालींना वेग आला आहे. २४३ जागा असलेल्या विधानसभेत भाजपने सर्वाधिक ८९ जागा जिंकल्या तर नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाने ८५ जागा जिंकल्या. तर तेजस्वी यादव यांच्या आरजेडी ला २५ जागा मिळाल्या असून काँग्रेस ६ तर डाव्या पक्षांना केवळ ४ जागा मिळाल्या आहेत. यानंतर आता बिहारचा मुख्यमंत्री होणार या चर्चेला उधाण आले आहे. त्यातच जेडीयूकडून करण्यात आलेली एक पोस्ट डिलिट केल्याने विविध तर्क लावण्यात येत आहेत.
बिहारच्या मुख्यमंत्रीपदावरून ‘जेडीयू’कडून पोस्ट डिलिट
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरुन ‘जेडीयू’ने केलेली पोस्ट डिलीट केल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. जेडीयूने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरील एका पोस्टमध्ये, “न भूतो न भविष्यति… नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री होते, आहेत आणि यापुढेही राहतील .” असं म्हणलं होत पण, त्यानंतर लगेचच ही पोस्ट हटवण्यात आली. त्यामुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

मुख्यमंत्रीपदावरून एनडीएमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता
नितीश कुमार हेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असं जरी ‘जेडीयू’ला वाटत असलं तरी याबाबत एनडीएकडून अद्याप कोणतीही औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून एनडीएमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता असल्याचे संकेत मिळत आहेत. एनडीएने ही निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाखाली लढवली असली तरी भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यामुळे भाजप बिहारमध्ये ‘महाराष्ट्र पॅटर्न‘ वापरणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
हेही वाचा – NDA च्या बंपर विजयानंतर कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? भाजपाचे प्रभारी तावडे म्हणाले
बिहारच्या मुख्यमंत्रीपदाबाबतचा सस्पेंन्स वाढला
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि बिहारचे प्रभारी असलेल्या विनोद तावडे याच्या वक्तव्याने मुख्यमंत्री पदाबाबतचा सस्पेन्स वाढला आहे. माध्यमांशी बोलताना तावडे म्हणाले, आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहार निवडणूक लढवली आहे. मुख्यमंत्री कोण असेल याचा निर्णय पाचही पक्ष एकत्रितपणे घेतील. भाजप आणि जेडीयू व्यतिरिक्त, एनडीएमध्ये जीतन राम मांझी यांचा पक्ष एचएएम, उपेंद्र कुशवाहांचा पक्ष आरएमएल आणि चिराग पासवान यांचा पक्ष एलजेपीआर यांचा समावेश आहे. त्यामुळं हे सर्व पक्ष मिळून मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवणार असल्याची माहिती तावडे यांनी दिली आहे. त्यामुळं नितीश कुमारांबाबत सस्पेंन्स कायम आहे.
आमदारांची बैठक होईल, अन् नेता ठरवला जाईल..
बिहार निवडणूकीच्या प्रचारादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री पदाबाबत एक मोठं वक्तव्य केलं होतं. पटना येथील एका कार्यक्रमात बोलताना अमित शहा म्हणाले होते की, “मी कोणाला मुख्यमंत्री बनवणारा नाही. एनडीए मध्ये पाच राजकीय मित्र पक्षांची महायुती आहे. निवडणुकीनंतर आमदारांची बैठक होईल, आणि तेव्हा नेता ठरवला जाईल. सध्या मात्र आम्ही नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढत आहोत, आणि तेच आमच्या प्रचाराचे नेतृत्व करत आहेत.” त्यांच्या या वक्तव्याचे आता वेगवेगळे अर्थ लावले आहेत आहेत.
चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांची घेतली भेट
बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर, केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांची भेट घेतली आहे. एनडीएच्या प्रचंड बहुमतासाठी त्यांचे मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्याचे त्यांनी सांगितलं.












