Supriya Sule | अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर बारामतीत विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक (Baramati By Election) पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या निवडणूक लढणार आहेत. काल (6 एप्रिल) सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. अशातच आता बारामती निवडणूक लढण्यासाठी काँग्रेस (Congress) पक्षाने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. तसेच काँग्रेस पक्ष ही निवडणूक लढवण्यावर ठाम असून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होणार नाहीये.
हेही वाचा – फरार कल्पना खरातने उचलले मोठे पाऊल; सरेंडर करणार? प्रकरणाला नवं वळण
काँग्रेसने उमेदवार जाहीर करताचा काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
काँग्रेसने बारामती पोटनिवडणुकासाठी आपला उमेदवार जाहीर करताच त्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही आमचा मोठा भाऊ अजित दादा गमावले आहेत. त्यामुळे बारामती विधानसभा पोटनिवडणूक हा आमच्यासाठी मोठा विषय आहे. बारामती हा माझ्यासाठी एक भावनिक भाग आहे. बारामतीकरांच्या आशीर्वादानेच पवारांचे नाव आज मोठे आहे. त्यामुळे ज्या पक्षांनी सुनेत्रा पवारांना या निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे त्या सर्व पक्षांचे मी आभार मानते.
पुढे सुप्रिया सुळेंनी काँग्रेस पक्षाच्या निर्णयावर भाष्य केलं. त्या म्हणाल्या की, काँग्रेस हा भारताच्या संविधानाच्या चौकटीत काम करणारा पक्ष आहे. आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे ते काँग्रेस पक्षामुळेच मिळाले आहे. आपण आज जो मोकळा श्वास घेत आहोत तो याच पक्षामुळे घेत आहोत. काँग्रेसने देशासाठी मोठं योगदान दिलं आहे. त्यामुळे त्यांचं योगदान नाकारून चालणार नाही.
काँग्रेस पक्षाच्या तालमीत आम्ही तयार झालो आहोत. तसेच मी काँग्रेसने दाखवलेल्या विश्वासामुळेच जिंकून आले आहे. तसेच निवडणुकीबाबत राजकीय पक्षाने काय निर्णय घ्यावा हा त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे. त्यांच्या पक्षाचं काहीतरी मत असू शकतं. प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. ज्यावेळी शरद पवार निवडणूकीला उभे राहिले होते तेव्हा आम्ही सगळ्यांसोबत चर्चा केली होती त्यामुळे ती निवडणूक बिनविरोध झाली होती. आत्ताच्या या निवडणुकीदरम्यान काँग्रेससोबत कोण बोललं आहे याबाबत मला माहिती नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मी सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत संवाद साधला आहे. कारण सध्याच्या घडीला संवाद असला पाहिजे. जरी राजकारणात मतभेद असले तरी मनभेद असता कामा नये. त्यामुळे आता जरी काँग्रेसने अर्ज दाखल केला असला तरी यावर चर्चा करून काही मार्ग काढता येऊ शकतो, असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.












