जेष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती पुन्हा चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. धर्मेंद्र यांच्या कुटुंबियांच्या घरी अॅम्ब्युलन्स पोहोचल्याची माहिती देण्यात आली आहे. पापाराझींचा त्रास होऊन नये म्हणून घराबाहेर बॅरिकेडिंगसुद्धा लावण्यात आले आहेत. तसेच धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल जुहू इथल्या घरी पोहोचली आहे. अन्य वृत्तवाहिन्यांनी याबाबत वेगवेगळ्या बातम्या चालवल्या आहेत. मात्र, लोकशिवाय कडे अधिकृत माहिती आलेली नाही.
10 नोव्हेंबर रोजी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ते व्हेंटिलेटरवर होते. त्यानंतर काही दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. धर्मेंद्र यांच्यावर जुहू इथल्या निवासस्थानीच पुढील उपचार करण्यात येतील, अशी माहिती डॉक्टरांनी दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांची तब्येत चिंताजनक असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा – ‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकु राजगुरु ने केली कमाल, व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क..
89 वर्षीय धर्मेंद्र यांना श्वास घेण्यास त्रास जाणवल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर 12 नोव्हेंबर रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. धर्मेंद्र रुग्णालयात असताना सलमान खान, शाहरुख खान, गोविंदा यांसारख्या कलाकारांनी त्यांची भेट घेतली होती. तर डिस्चार्ज मिळाल्यानंतर अमिताभ बच्चन स्वत: कार चालवत धर्मेंद्र यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.
धर्मेंद्र रुग्णालयात असताना त्यांच्या निधनाची अफवा पसरली होती. त्यानंतर हेमा मालिनी आणि त्यांची मुलगी इशा देओल यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित अफवा पसरवणाऱ्यांवर राग व्यक्त केला होता. त्याचसोबत अशा पद्धतीच्या खोट्या बातम्या न पसरवण्याची विनंती केली होती. तर देओल कुटुंबीयांनी त्यांच्या खासगीपणाचा आदर करण्याचं आवाहन केलं होतं.
Mumbai: An Ambulance was seen entering actor Dharmendra’s residence, the area was barricaded 50 meters from the house pic.twitter.com/w16rSACXaB
— IANS (@ians_india) November 24, 2025
धर्मेंद्र यांचा चुलत भाऊ आणि निर्माते गुड्डू धनोआ यांनी रविवारी त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली होती. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “ते ठीक आहेत. यापेक्षा अधिक मी काही बोलू शकत नाही. मला तेवढी माहिती नाही. पण ते ठीक आहेत आणि त्यांची प्रकृती हळूहळू सुधारतेय.” मात्र त्यानंतर आता पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येताच चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
“धर्मेंद्रजींच्या प्रकृतीची आम्हा सर्वांनाच खूप काळजी आहे. त्यांच्या मुलांची तर झोपच उडाली आहे. पण होय, ते घरी आल्यामुळे मी खुश आहे. ते रुग्णालयातून बाहेर पडले, याचा आम्हाला दिलासा आहे. जे लोक त्यांच्यावर प्रेम करतात, त्यांच्यासोबत त्यांनी राहणं गरजेचं आहे. बाकी तर सर्व देवाच्याच हातात आहे. कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा”, अशा शब्दांत हेमा मालिनी व्यक्त झाल्या होत्या.












