खंडवा (मध्य प्रदेश) : दसऱ्याच्या दिवशी खांडवा येथे एक मोठा अपघात घडला. संध्याकाळी उशिरा, दुर्गा मूर्तीच्या विसर्जनादरम्यान अर्दला धरणाच्या बॅकवॉटरमध्ये मूर्ती विसर्जित करताना भाविकांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यात आठ मुलींचा समावेश आहे. ट्रॅक्टर-ट्रॉलीमध्ये ३० हून अधिक लोक प्रवास करत होते. घटनास्थळी प्रशासन बचाव कार्य करत आहे.
पंधना ब्लॉकच्या अर्दला गावात दसऱ्याच्या दिवशी दुर्गा मूर्ती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना घडली. संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमाराला अर्दला धरणाच्या बॅकवॉटरमध्ये दुर्गा मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जमली होती. गावातील लोक मोठ्या संख्येने लोक ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन आले होते. या लहान मुलांचा समावेश होता. चालकानं ट्रॅक्टर ट्रॉली पुलावर उभी केली. या ट्रॉलीमध्ये ३० हून अधिक लोक होते. पूल अचानक कोसळल्यानंतर ट्रॅक्टर ट्रॉली उलटली. टॉलीमधील सर्वजण नदीच्या पाण्यात बुडाले.
ट्रॅक्टर-ट्रॉली उलटल्यानंतर लोकांमध्ये गोंधळ उडाला. काठावर उभ्या असलेल्या महिला आणि मुलांनी आक्रोश करायला सुरुवात केली. काही तरुणांनी नदीत उडी घेऊन जीव वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, धरणातील पाण्याची पातळी जास्त असल्यानं त्यांना वाचवण्यात अडचण आली. अनेकजण डोळ्यादेखत बुडत असल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि एसडीआरएफ पथके घटनास्थळी दाखल झाली. एसडीआरएफकडून बचाव कार्य सुरू करण्यात आलं. आतापर्यंत आठ मुलींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अजूनही बरेच लोक पाण्यात बुडाले असण्याची शक्यता असल्यानं बचाव कार्य सुरू आहे.
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोहोचले-घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी ऋषव गुप्ता आणि पोलीस अधीक्षक मनोज कुमार राय अर्दला गावात पोहोचले. घटनास्थळी असलेल्या लोकांनी त्यांना घटनेची माहिती दिली. मृतदेहांसह जिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिका पोहोचली. जखमींवर त्वरित उपचार आणि जीव वाचवण्यासाठी रुग्णालयातील आपत्कालीन कक्षालाही सतर्क ठेवण्यात आले.