Grand worship of Lord Vitthal : कार्तिकी एकादशीच्या शुभदिनी पंढरपुरातील विठ्ठलाच्या मंदिरात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब शासकीय महापूजा केली. यावेळी नांदेडच्या हिमायतनगरमधील पोटा गावचे रामराव आणि सुशीलाबाई वालेगावकर कुंटूंबाला या शासकीय महापूजेला बसण्याचा बहुमान मिळाला. यावर्षी प्रथमच जिल्हा परिषद शाळेतील दोन मुलांना शासकीय महापुजेमध्ये सहभागी करून घेण्यात आलं होतं. पूजेनंतर मंदिर समितीच्या वतीनं एकनाथ शिंदे आणि पुजेचे मानकरी वालेगावकर कुंटुंबाला तुळशीची माळ घालून सन्मानित करण्यात आलं.
राज्यात सध्या शेतकऱ्यांना आस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे. नोव्हेंबर महिना आला तरीही पाऊस पडत असल्यानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होतं आहे. त्यामुळे राज्यातील बळीराजाला सुखी, समाधानी, आनंदी ठेव, त्यांच्यावरील सर्व संकट दूर कर, असं साकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठुरायाच्या चरणी घातल्याचे त्यांनी सांगितलं.
हे ही वाचा – Satyacha Morcha : आयोजकांवर पोलिसाची कारवाई, आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना महापूजेचा बहुमान
कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठल रखुमाईची आज पहाटे अडीच वाजता शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी मानाचे वारकरी म्हणून नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील पोटी गावातील वारकरी रामराव वालेगावकर यांच्यासह मोहोळ तालुक्यातील पापरी व देवडे येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना महापूजेचा बहुमान मिळाला. कार्तिकी एकादशीनिमित्त आज मंदिरात आकर्षक फुलांची सजावट देखील करण्यात आली. कार्तिकीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे सहा लाख भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत.
महाराष्ट्र सगळ्या क्षेत्रात नंबर एक होऊ दे
“पंढरपूरमध्ये आल्यानंतर वेगळे समाधान मिळते. महापूजा करण्याचे भाग्य मिळाले. बळीराजा संकटात आहे. त्याच्यावरील अरिष्ट दूर कर, मंत्री मंडळाने 32 हजार कोटींचे मदत दिली. कर्जमाफी उपाय बाबत सरकारने निर्णय घेतलाय. त्याची शिफारस एप्रिलमध्ये येईल. शेतकरी, वारकरी, लाडक्या बहिणी सगळ्याच्या जीवनात सुख समाधान आनंदाचे दिवस येऊ दे. सगळं संकट दूर होऊ दे. महाराष्ट्र सगळ्या क्षेत्रात नंबर एक होऊ दे,” असं पांडुरंगाकडं साकडं घातल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
चंद्रभागा प्रदूषण मुक्तीसाठी 120 कोटी रुपयांचा पहिला टप्पा मंजूर
पंढरपूरची चंद्रभागा नदी वारकऱ्यांची पवित्र गंगा आहे. ही चंद्रभागा कायमस्वरूपी प्रदूषण मुक्त व्हावी, यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून नगर विकास खात्याने चंद्रभागा प्रदूषण मुक्तीसाठी 120 कोटी रुपयांचा पहिला टप्पा मंजूर केला आहे. यामधून पंढरपूर शहरांमध्ये ड्रेनेजसह महिला मिश्रित येणारे पाणी बंद केले जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपुरात दिली












