Narhari Zirwal Viral Video Case | मागील काही दिवसांपासून मंत्री नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) हे चांगलेच आले चर्चेत आहेत. नरहरी झिरवळ यांचा एका ट्रान्सजेंडर व्यक्तीसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमुळे नरहरी झिरवळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर झिरवळ यांच्यावर राजकीय वर्तुळातून जोरदार टीका करण्यात आली होती. तर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अशातच आता झिरवळांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी पोलिसांनी पहिला गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा – एकनाथ शिंदे ॲक्शन मूडमध्ये! दोन मंत्र्यांची खुर्ची धोक्यात; लवकरच ‘नारळ’ देण्याची शक्यता
नरहरी झिरवळ यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत त्यांच्यासोबत ट्रान्सजेंडर पवन यादव सोबत दिसत आहे. व्हिडीओमध्ये झिरवळ हे पलंगावर झोपलेले दिसत होते तर त्यांच्या शेजारी ट्रान्सजेंडर पवन यादवही होता. तसेच त्यांच्या खोलीत आणखी एक कर्मचारी देखील होता. तर त्याठिकाणी मद्याच्या बाटल्या आणि खाद्य पदार्थही दिसत होते. या व्हिडीओने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडवून दिलेली. तर आता मुंबई पोलिसांनी या व्हिडीओप्रकरणी कडक कारवाई केली आहे.
पोलिसांनी कोणावर केला गुन्हा दाखल? नेमका आरोप काय?
मुंबई पोलिसांनी नरहरी झिरवळ यांच्या व्हायरल व्हिडीओप्रकरणी पहिला गुन्हा दाखल केला आहे. ट्रान्सजेंडर पवन यादवच्या भावाविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंबईच्या कफ परेड पोलीस स्थानकात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
झिरवळ यांचा व्हिडीओ एडिट करून तो व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी पवन यादवच्या भावाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पवनच्या भावाने पवनला धमकी दिली होती. FDA मध्ये मला नोकरी लाव नाहीतर तुझा व्हिडीओ व्हायरल करतो, अशी धमकी पवनला त्याच्या भावाने दिली होती. त्यानंतर त्याने व्हिडीओही व्हायरल केला होता. याप्रकरणी पोलिसांनी पवनच्या भावावर गुन्हा दाखल केला असून ते पुढील तपास करत आहेत. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग होता का? याबाबतही पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान, नरहरी झिरवळ यांचा व्हायरल झालेला व्हिडीओ हा सात महिन्यांपूर्वीचा असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, हा व्हिडीओ अचानक व्हायरल झाल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. महायुतीने सत्ता आपल्या हाती राहावी म्हणून असे व्हिडीओ समोर आणत आमच्या मंत्र्याना चेकमेट करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडून केला जात आहे.












