नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएस यंदा त्यांच्या शताब्दी वर्षाचा विजयादशमी सोहळा साजरा करणार आहे. नागपूरमध्ये 2 ऑक्टोबरला हा प्रमुख कार्यक्रम आयोजित केला जाणार असून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित राहणार आहेत. संघाच्या शताब्दी वर्षातील हा उत्सव ऐतिहासिक ठरणार असल्यानं संघ परिवाराच्या विविध स्तरांवर तयारी जोरात सुरु आहे. किंबहुना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अमरावतीच्या शाखेच्या वतीनं विजयदशमी उत्सवाचं आयोजन पाच ऑक्टोबरला केले जाणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री, दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका अध्यक्ष डॉ. कमल गवई उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं त्यांच्या उपस्थितीतीची विशेष चर्चा आहे.
अमरावतीत कमलताई गवईंची विशेष उपस्थिती :
5 ऑक्टोबरला अमरावती इथं होणाऱ्या विजयादशमी सोहळ्याचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई कमलताई गवई प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. कमलताई गवईंचा परिवार दीक्षाभूमीच्या उभारणीत महत्त्वपूर्ण ठरला असून माजी राज्यपाल दिवंगत रा. सू. गवई हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष होते. सध्या त्यांचे चिरंजीव राजेंद्र गवई स्मारक समितीचे सदस्य आहेत. कमलताई गवईंची उपस्थिती यंदाच्या शताब्दी वर्षातील विजयादशमी सोहळ्यास अधिक विशेष आणि चर्चेचा विषय बनवली आहे.
नागपूरमध्ये गणवेशधारी स्वयंसेवकांचा मोठा सहभाग :
दसऱ्याच्या दिवशी नागपूरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात संघ परिवारातील विविध संस्थांचे प्रमुख आणि तब्बल पंधरा हजारांवर गणवेशधारी स्वयंसेवक उपस्थित राहणार आहेत. याशिवाय, विविध देशांमधील आंतरराष्ट्रीय दुतावासांना देखील निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळं विदेशी पाहुणे, चित्रपट अभिनेते, उद्योजक अशा विविध क्षेत्रातील लोकही या ऐतिहासिक सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व :
विजयादशमीचा दिवस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेशी संबंधित आहे. 1925 मध्ये संघाची स्थापना 2 ऑक्टोबरला झाली होती. तसंच, नागपूरमधील दीक्षाभूमीवर 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्यामुळं यंदा नागपूरमध्ये विजयादशमीला संघभूमी आणि दीक्षाभूमी या दोन ठिकाणी महत्त्वपूर्ण कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.
देशभरात पथसंचलनाचं आयोजन :
शताब्दी वर्ष साजरं करण्यासाठी देशभरातील स्वयंसेवकांनी उत्सुकता दाखवली आहे. मात्र, मैदानाची मर्यादा लक्षात घेता सर्वांना प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नाही. त्यामुळं नागपूरसह देशभरातील शाखांमध्ये पथसंचलनाचं आयोजन केलं जाणार आहे. संघाच्या या विशेष वर्षातील विजयादशमी सोहळ्याद्वारे आरएसएसनं आपल्या इतिहासाची आणि योगदानाची गाथा साजरी करण्याची तयारी केली आहे.