IND vs NZ 1st ODI : न्यूझीलंड क्रिकेट संघ तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतात आला आहे. दोन्ही संघांमधील वनडे मालिका 11 जानेवारीपासून सुरु होईल. पहिला सामना वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर खेळला जाईल. हे वर्ष भारतासाठी खूप व्यस्त आहे, पुढील महिन्यात टी-20 विश्वचषक होणार आहे. न्यूझीलंडविरुद्धची ही मर्यादित षटकांची मालिका महत्त्वाची आहे.
रोहित-कोहली दिसणार मैदानात :
भारतीय क्रिकेटमधील दोन सर्वात मोठे सुपरस्टार रोहित शर्मा आणि विराट कोहली देखील या मालिकेत सहभागी होतील. रोहित आणि विराटनं कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्ती घेतली आहे. दोघंही फक्त वनडे सामने खेळतात. बडोदा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर हा पहिलाच पुरुष आंतरराष्ट्रीय सामना असेल. भारत आणि वेस्ट इंडिज महिला संघ 2024 मध्ये इथं खेळले होते. हे मैदान 200 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलं होतं आणि त्याची बसण्याची क्षमता 40,000 प्रेक्षकांची आहे.
गिल करणार पुनरागमन :
भारतीय वनडे कर्णधार शुभमन गिल मानेच्या दुखापतीमुळं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान उपकर्णधार श्रेयस अय्यरला दुखापत झाली. दोन्ही खेळाडू न्यूझीलंडविरुद्ध मैदानावर दिसतील. अय्यरनं विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी दोन सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यानं अर्धशतक झळकावलं आहे. तो चांगल्या फॉर्ममध्ये असल्याचं दिसतं आणि त्यानं एका सामन्यात अर्धशतकही झळकावलं आहे.
भारतीय संघाचा वरचष्मा :
भारत आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत एकूण 120 वनडे सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी भारतानं 62 आणि न्यूझीलंडनं 50 सामने जिंकले आहेत. अशा प्रकारे, टीम इंडियाचा वरचष्मा आहे. दुसरीकडे, भारत आणि न्यूझीलंडमध्ये खेळल्या गेलेल्या मागील सात वनडे सामन्यांमध्ये फक्त भारतीय संघच जिंकण्यात यशस्वी झाला आहे.
लाईव्ह सामना कधी आणि कुठं पाहायचा? :
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना रविवार, 11 जानेवारी रोजी खेळला जाईल. सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 वाजता सुरु होईल. नाणेफेक दुपारी 1 वाजता होईल. या सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ हॉटस्टारवर पाहता येईल. याव्यतिरिक्त, तुम्ही प्रसारण पाहण्यासाठी स्टार स्पोर्ट्स नेटवर्कला भेट देऊ शकता.
सामन्यासाठी दोन्ही संघ :
भारत : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, यशस्वी जयस्वाल.
न्यूझीलंड : मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), आदित्य अशोक, ख्रिश्चन क्लार्क, जोश क्लार्कसन, डेव्हॉन कॉनवे, जॅक फॉल्क्स, मिच हे, काइल जेमिसन, निक केली, जेडेन लेनोक्स, डॅरिल मिचेल, हेन्री निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मायकेल रे, विल यंग.








