Global Weather : देशभर आणि जगभरातील हवामान बदलत असल्याचं दिसून येत आहे. 2025 मध्ये भारतातील पर्वतांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत बर्फवृष्टी कमी झाली. हवामान अंदाज एजन्सी स्कायमेट वेदरनुसार, पश्चिमी विक्षोभांचा परिणाम साधारणपणे ऑक्टोबरच्या मध्यापासून पश्चिम हिमालयावर होतो. नोव्हेंबरमध्ये पाऊस आणि हिमवर्षाव सुरु होतो आणि डिसेंबरमध्ये काही शक्तिशाली पश्चिमी विक्षोभांमुळं मध्यम ते जोरदार हिमवर्षाव होतो. मात्र, 2025 मध्ये असं झालं नाही. 2024 मध्ये असाच कोरडा पॅटर्न दिसून आला.
ऑस्ट्रेलियामध्ये कडक उन्हाचा अनुभव :
जगाच्या विविध भागात असामान्य हवामान बदल देखील दिसून येत आहेत. स्कायमेट वेदरनुसार, ऑस्ट्रेलियाच्या अनेक भागात तीव्र उष्णतेची लाट आली आहे. दक्षिण ऑस्ट्रेलिया, व्हिक्टोरिया आणि उत्तर न्यू साउथ वेल्समध्ये तापमान 47 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. पश्चिम ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या उष्णतेच्या लाटेनं विक्रम मोडले आहेत, अनेक ठिकाणी तापमान 50 अंश सेल्सिअसच्या जवळपास पोहोचलं आहे.
2020 नंतर सर्वात उष्ण दिवस :
7 जानेवारी रोजी राज्याच्या उत्तर किनाऱ्यावरील ऑनस्लो विमानतळावर तापमान 49 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. ऑस्ट्रेलिया किंवा राज्यात नोंदवलेलं हे सर्वात जास्त तापमान नसलं तरी, ऑनस्लो विमानतळ त्या दिवशी जगातील सर्वात उष्ण ठिकाण बनले. तसंच 2020 नंतर मेलबर्नमध्येही सर्वात उष्ण दिवस नोंदवला गेला.
गोरेट्टी वादळाचा युकेवर परिणाम :
गोरेट्टी वादळाचा युनायटेड किंग्डम (यूके) वर लक्षणीय परिणाम झाला आहे. मुसळधार पाऊस, वारे आणि सततच्या बर्फवृष्टीचा देशाच्या बहुतेक भागावर परिणाम झाला आहे. उत्तर युरोपमध्येही बर्फवृष्टी झाली आहे, ज्यामुळं विमानतळांची धावपट्टी बंद करावी लागली आहे आणि विमान वाहतूक विस्कळीत झाली आहे. बर्फवृष्टी आणि खराब हवामानामुळं नेदरलँड्समधील रेल्वे आणि रस्ते नेटवर्कवर परिणाम झाला आहे. वादळाचा परिणाम फ्रान्स, जर्मनी, स्वीडन, फिनलंड आणि वेल्समध्ये जाणवला आहे, जिथं हिमवादळं आणि कडाक्याच्या थंडीमुळं परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.






