India vs England : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ आता शेवटच्या टप्प्यावर पोहोचला आहे. मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर स्पर्धेचा दुसरा सेमीफायनल सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवला जाणार आहे. गतविजेता भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा विजेतेपदावर नाव कोरण्यासाठी सज्ज आहे, तर इंग्लंड २०१२ चा इतिहास पुन्हा रचण्याच्या तयारीत आहे. भारत आणि इंग्लंड हे दोन संघ टी-२० विश्वचषकाच्या बाद फेरीत एकमेकांचे जुने प्रतिस्पर्धी बनले आहेत. सलग तिसऱ्या विश्वचषकात हे दोन्ही संघ सेमीफायनलमध्ये भिडत आहेत. त्यामुळे सर्व क्रिकेटप्रेमींचे या हायव्होल्टेज सामन्याकडे लक्ष लागले आहे.
हेही वाचा – वानखेडेवर रंगणार ५ तारखेला भारत विरुद्ध इंग्लंड हायव्होल्टेज सेमीफायनल सामना, कोण मारणार बाजी?
२०२२ ला इंग्लंडने भारताचा १० विकेट्सनी धुव्वा उडवला होता. तर २०२४ ला भारताने इंग्लंडला ६८ धावांनी नमवून त्या पराभवाचा बदला घेतला होता. आता २०२६ ला वानखेडेच्या मैदानात या ट्रिलॉजीचा तिसरा आणि निर्णायक अध्याय लिहिला जाणार आहे. भारतीय संघाने सुपर-८ च्या शेवटच्या थरारक सामन्यात वेस्ट इंडिजला ५ विकेट्सनी हरवून सेमीफायनलचे तिकीट मिळवले आहे. या सामन्यात संजू सॅमसनने नाबाद ९७ धावांची ऐतिहासिक खेळी करून भारताचा विजय निश्चित केला होता. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली संघ फॉर्ममध्ये दिसत असून अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांची आक्रमक फलंदाजी संघासाठी जमेची बाजू आहे.
मुंबईची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक
गोलंदाजीत जसप्रीत बुमराह हा नेहमीप्रमाणे भारताचा हुकमी एक्का असेल, तर अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेल यांची कामगिरी निर्णायक ठरेल. मुंबईची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक असल्याने भारतीय फलंदाजांकडून मोठी धावसंख्या अपेक्षित आहे.
इंग्लंडचा संघ हॅरी ब्रूकच्या नेतृत्वाखाली जबरदस्त फॉर्मात
इंग्लंडचा संघ हॅरी ब्रूकच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेत जबरदस्त फॉर्मात आहे. सुपर-८ फेरीत सलग पाच विजय मिळवून त्यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. जोस बटलर, फिल सॉल्ट आणि सॅम करन हे कोणत्याही क्षणी सामन्याचा निकाल फिरवू शकतात. सॅम करनने वानखेडेच्या गर्दीला शांत करण्याचा निर्धार व्यक्त केला असून इंग्लंडचे वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आणि आदिल रशीद भारतीय फलंदाजांची परीक्षा घेतील.
रात्रीच्या वेळी Dew फॅक्टर महत्त्वाचा ठरेल
वानखेडेची खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन मानली जाते. येथे चेंडू बॅटवर चांगला येतो आणि लहान सीमारेषांमुळे षटकारांची बरसात होण्याची दाट शक्यता आहे. रात्रीच्या वेळी Dew फॅक्टर महत्त्वाचा ठरेल, त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. या सामन्यातील विजेता संघ ८ मार्च रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध खेळेल. न्यूझीलंडने पहिल्या सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून आधीच फायनलमध्ये स्थान निश्चित केले आहे.
गुणतालिकेनुसार इंग्लंड फायनलसाठी पात्र
जर पावसामुळे आजचा सामना होऊ शकला नाही, तर उद्याचा दिवस राखीव दिवस वापरला जाईल. पण दोन्ही दिवस खेळ झाला नाही, तर सुपर-८ च्या गुणतालिकेनुसार इंग्लंड फायनलसाठी पात्र ठरेल कारण ते त्यांच्या ग्रुपमध्ये अव्वल स्थानावर होते. त्यामुळे भारताला हा सामना मैदानात जिंकणे अनिवार्य आहे.
कुणाचं फायनल खेळण्याचं स्वप्न फुलवणार?
सध्या मुंबईत पावसांची शक्यता तर आजिबात नाही, मात्र चौकार आणि षटकारांमुळे धावांचा पाऊस नक्की पडू शकतो, आता धावांचा पाऊस कुणाला वाहून नेणार आणि कुणाचं फायनल खेळण्याचं स्वप्न फुलवणार? हे तर सामन्यानंतरच कळेल…मात्र भारत आणि इंग्लंड या संघाची सुरूवातीपासून टशनचा एक इतिहास राहिला आहे, त्याच मुंबई अँड्रयू फ्लिन्टॉफनं टी-शर्ट काढून गांगूली आणि टीमला चिडवलं होतं, त्याचा बदला गांगूलीनं थेट इंग्लंडच्या लॉर्ड स्टेडियवर शर्ट उतरवून घेतला होता, नेटवेस्टची ती फायनल कोणच विसरू शकत नाही, हा इतिहास राहिलेले दोन संघ नव्या दमानं पुन्हा एकमेकांना भिडणार आहेत, त्यामुळे या सामन्याची रंगत वाढली आहे.











