अहिल्यानगर : ओबीसी आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर अज्ञात तरुणांनी हल्ला केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. ही घटना अहिल्यानगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील आरनगाव बाह्यवळण रस्त्यालगत घडली. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हाकेंनी काल (शुक्रवार) एक भावनिक पोस्ट केली होती, त्यानंतर ही घटना घडली.
कशी घडली घटना? :
आज सकाळी लक्ष्मण हाके दैत्य नांदूर (ता. पाथर्डी) इथं आयोजित ओबीसी एल्गार सभा साठी जात होते. या प्रवासादरम्यान हाके अहिल्यानगरजवळ नाश्ता करण्यासाठी थांबले. नाश्ता करुन पुन्हा प्रवास सुरू करत असतानाच आरनगाव बाह्यवळण रस्त्यावर काही अज्ञात तरुणांनी त्यांच्या गाडीला अडवून अचानक काठ्यांनी हल्ला केला.
हल्ल्यामुळं वाहनाचं नुकसान :
या हल्ल्यात त्यांच्या वाहनाचं मोठं नुकसान झालं असून, काचा फोडण्यात आल्या आहेत. सुदैवानं हाके यांना शारीरिक इजा झाली नसल्याचं प्राथमिक माहितीतून स्पष्ट झालं आहे. या हल्ल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
हाकेंची भावनिक पोस्ट :
दरम्यान, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी शुक्रवारी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर भावनिक पोस्ट केली होती. “मी ओबीसी च्या बाजूनं बोलत गेलो, भांडत गेलो, ओबीसीच्या छोट्या छोट्या जात समूहाना जोडत गेलो, लाखो माणसं जोडली पण शत्रू ची संख्या सुद्धा वाढत गेली, हल्ले झाले, झेलले, पण आत्ता सहन होत नाही, उद्या दैत्यानांदूर ता पाथर्डी जि अहिल्यानगर च्या ओबीसी मेळाव्यानंतर मी माझी भूमिका जाहीर करेन, मी आंदोलनात असेन किंवा नसेनही तुम्ही जेवढी साथ दिलीत त्याबद्दल जाहीर जाहीर आभार मानतो,” असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं होतं.