IMD Weather Alert | राज्यात सध्या उन्हाळ्याचे (Summer) दिवस सुरू आहेत. पण मागील काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होताना दिसत आहेत. फेब्रुवारी महिन्यात अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. कारण या अवकाळी पावसात अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. तर आताही हवामान विभागानं (IMD) मोठा इशारा दिला आहे. मार्च महिन्यातही अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
हेही वाचा – इराणच्या हल्ल्यांविरुद्ध संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाला भारताचा पाठिंबा
येत्या शनिवारी (14 मार्च) आणि रविवारी (15 मार्च) राज्यात काही जिल्ह्यांना हवामान विभागानं सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
हवामान विभागानं कोणत्या जिल्ह्यांना दिला सतर्कतेचा इशारा?
हवामान खात्याकडून विदर्भातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच अवकाळी पावसासोबतच ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारेही वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, धाराशिव, लातूर या भागांमध्ये येत्या शनिवारी आणि रविवारी अवकाळी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोबतच गडचिरोली आणि चंद्रपूरमध्येही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना हवामान खात्यानं सतर्कतेचा इशारा दिला आहे.
आंबा उत्पादकांना मोठा फटका
हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे आणि अवकाळी पावसामुळे अनेक आंबा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे आणि अवकाळी पावसामुळे धाराशिव जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या आंब्याच्या झाडांचे मोहोर गळून पडल्यामुळे मोठा फटका बसला आहे. यावर्षी अंब्याचे उत्पादन कमी होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या अवकाळी पावसाचा जोरदार फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
दरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कडाक्याचे उन्ह असून उकाडा प्रचंड वाढला आहे. अनेक शहरांमध्ये उन्हाचा पारा 40 अंशावर पोहाचला आहे. त्यामुळे उन्हाळा सुरू होताच उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे नागरिक उकाड्याने हैराण झाल्याचं पहायला मिळत आहे. यापार्श्वभूमीवर डॉक्टरांनी दुपारच्या वेळी जर काम नसेल तर बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.
एकिकडे राज्यात उन्हाचा तडाखा जाणवत असताना दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावणार असल्याची चिन्हं दिसत आहेत. हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यामुळे अनेक जिल्हांवर मोठे संकट निर्माण झाले आहे.












