मुंबई : राज्यभरात पावसानं थैमान घातलं आहे. यामुळं राज्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. अशा स्थितीत सरकारनं 2215 कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
काय म्हणाले दत्तात्रय भरणे :
कृषीमंत्री म्हणाले “सरकार शेतकऱ्यांच्या बाजूनं असून आज राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसंच अनेक मंत्री बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करत आहेत. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी झालेली मागणी अयोग्य नाही, सरकार सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहे.” तसंच दिवाळीपूर्वी सर्व पिकांचे पंचनामे करून मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी खात्री कृषिमंत्र्यांनी दिली.
मराठवाड्यात तीन जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान :
मराठवाड्यात तीन जिल्ह्यांत सर्वाधिक नुकसान झालं आहे. ऑगस्ट महिन्याच्या मध्यानंतर पावसानं मराठवाड्यात जोर धरला असून सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद आहे. या भागातील नांदेड, धाराशिव आणि जालना जिल्ह्यांत सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. राज्यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असून पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. जालना जिल्ह्यात सुमारे 2 लाख 54 हजार एकर शेती नुकसानग्रस्त झाली असून सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात झालं आहे. पंचनामे युद्धपातळीवर सुरू असून आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शेतावर पाहणीसाठी पोहोचले आहेत. नुकसान भरपाई लवकर मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जून आणि जुलै महिन्यांत झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण होऊन मदत पोहोचली असून, उर्वरित मदत लवकरच देण्यात येईल, असं आश्वासन मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
नुकसान भरपाईसाठी 2215 कोटी मंजूर :
नुकसान भरपाईसाठी 2215 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आतापर्यंत पंचनामे करून नुकसानाचा आढावा घेतला असून, आज मंगळवारी (24 सप्टेंबर) शासनानं 2215 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. अजून झालेल्या नुकसानीचे आकडे वाढत असून, त्या नुकसानासाठी देखील मदत लवकरच मिळेल. दिवाळीच्या आधी सर्व मदत देण्याची व्यवस्था करण्याचा सरकार प्रयत्नशील आहे, असंही कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नमूद केलं.
अशा बँकांना राज्य सरकार बँकांना सूचना देणार :
दरम्यान, राज्यात पावसामुळे मोठं नुकसान झालं असताना काही बँका थकबाकी वसुलीसाठी तगादा लावत असल्याबाबतही मंत्री भरणेंना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना सांगितलं की, “ज्या भागात नुकसान झालं आहे, तिथं कर्ज वसुली तत्काळ थांबवली पाहिजे. यासाठी राज्य सरकार बँकांना सूचना देणार असल्याचं भरणे यांनी सांगितलं. कोणत्याही शेतकऱ्यानं नुकसानीचे फोटो पाठवण्याची गरज नाही. आमच्या विभागाचे कृषी आणि महसूल कर्मचारी स्वतः बांधावर जाऊन पंचनामे करतील, असंही कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केलं आणि शेतकऱ्यांनी धीर धरण्याचं आवाहन केलं.