राज ठाकरेंनी दुबार मतदार यादी जाहीर केल्यानंतर आज आशिष शेलार यांनी सत्य आणि खरं मांडण्याची आमची भूमिका असल्याचं म्हणत पत्रकार परिषद घेत दुबार मतदारांची यादी दाखवली. यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंना लक्ष केल्याचे पाहायला मिळालं. राज ठाकरे व्होट जिहाद करतात, अशी जहरी टीका मंत्री आशिष शेलार यांनी केली. त्यामुळे पुढील काळात भाजप आणि ठाकरे बंधु यांच्यामध्ये संघर्ष होणं अटळ असल्याचे दिसून येत आहे. विरोधकांकडून फेक नरेटिव्हची बांधणी केली जात आहे. जयंत पाटलांच्या इस्लामपुरात आणि रोहित पवारांच्या कर्जत-जामखेडमध्ये अनेक दुबार मुस्लीम मतदार आहेत, असं म्हणत आशिष शेलार यांनी दुबार मुस्लीम मतदारांचे पुरावे दिले.
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमधील कथित गैरप्रकार आणि मतचोरीच्या आरोपांवरून महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. याच मुद्द्यावर मुंबईत नुकताच ‘सत्याचा मोर्चा’ काढण्यात आला, ज्यामध्ये महाविकास आघाडीचे नेते, तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. या मोर्चादरम्यान आपल्या राज ठाकरे यांनी मतदार याद्यांमधील दुबार मतदारांविरोधात थेट “खळखट्याक” करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. यापूर्वी त्यांनी “लाव रे तो व्हिडीओ” म्हणत राज्य सरकारवर टीका केली होती. आता त्याच वाक्याचा आधार घेत भाजपनेही प्रत्युत्तर दिले असून ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत राज ठाकरे यांचा एक व्हिडीओ दाखवत उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.
हे ही वाचा – Satyacha Morcha : आयोजकांवर पोलिसाची कारवाई, आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
गळा मतचोरीचा… पण पुळका ‘व्होट जिहाद’चा!
मंत्री आशिष शेलार त्यांनी महाविकास आघाडीवर गंभीर आरोप करत, “गळा मतचोरीचा… पण पुळका ‘व्होट जिहाद’चा!” अशी टीका केली. लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात दुबार मतदारांची नोंद झाल्याचा आरोप करत “महाविकास आघाडीने प्रामाणिक मतदारांची नावे वगळून ‘व्होट जिहाद’चा डाव रचला,” असे त्यांनी म्हटले. तर राज ठाकरे व्होट जिहाद करत असल्याचा आरोप देखील आशिष शेलार यांनी केला.
महाविकास आघाडीवर ‘व्होट जिहाद’चा आरोप
लोकसभा निवडणुकीत अनेक प्रामाणिक मतदारांची नावे वगळली गेली आणि हे पाप महाविकास आघाडीने केले. हा एक सुनियोजित ‘व्होटजिहाद’ होता. देश, देशातील यंत्रणा, देशाच्या सुरक्षेशी हा खेळण्याचा प्रकार होता. आज या सर्वांचा भंडाफोड आम्ही करणार आहोत. महाविकास आघाडीने केलेले प्रताप सांगण्यासाठीच आजची पत्रकार परिषद असल्याचे शेलार म्हणाले.
दुबार मतदारांचा मुद्दा पुढे
“आम्ही केवळ 31 विधानसभा मतदारसंघांचे विश्लेषण केले असून, त्यात मुस्लिम आणि ख्रिश्चन अशा दुबार मतदारांची संख्या 2 लाख 25 हजार 791 आहे. संपूर्ण 288 मतदारसंघांचे विश्लेषण पूर्ण झाल्यानंतर ही संख्या 16 लाख 84 हजार 256 इतकी असेल.” ही केवळ मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदारांची दुबार संख्या आहे. यात महाविकास आघाडीचे समर्थक नाहीत. ती आणखी कितीतरी मोठी असू शकते,” असं आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.











