Rohit Pawar | राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं आहे. अजित पवारांच्या विमान अपघाताला (Ajit Pawar Plane Crash) आता महिना उलटून गेला आहे तरीही त्यांच्या अपघातावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. अजित पवारांचा खरंच अपघात होता की घातपात होता? असा सवाल अद्यापही उपस्थित केला जात आहे. तर या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे गेल्या अनेक दिवसांपासून विविध पुरावे सादर करताना दिसत आहेत. आताही रोहित पवारांनी काही खळबळजनक दावे केले असून त्यांनी VSR कंपनीच्या मालकावर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी एका बड्या नेत्याचाही उल्लेख केला आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळाच चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा – धक्कादायक! दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या घरी चोरी, कुटुंब झोपेत असताना चोरट्यांनी साधला डाव
नेमंक काय म्हणाले रोहित पवार?
रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, दिल्लीत पत्रकार रजत शर्मा यांच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनला गेलेला महाराष्ट्रातला अत्यंत मोठा नेता VSR च्या विमानाने परत येतो. प्रायव्हेट चार्टर टर्मिनलवर त्या नेत्याला VSR चा मालक व्ही. के. सिंग घ्यायला येतो आणि त्या नेत्याशी हस्तांदोलन करतो. नंतर त्या नेत्याच्या पीएच्या हातात काही कागद देतो. विशेष म्हणजे अजितदादांच्या अपघातातील मृत पायलट कपूरचा मुलगा त्या नेत्याच्या विमानाचा पायलट असतो. हे सगळं आश्चर्यचकित करणारं नाही का? असा खळबळजनक दावा रोहित पवारांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले की, माझं आजही सांगणं आहे की, अजितदादा अपघात प्रकरण हलक्यात घेऊ नका. व्ही. के. सिंगला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करू नका आणि स्वतःही त्या विमानाने प्रवास करणं टाळा आणि स्वतःचीही काळजी घ्या. VSR वर एवढा विश्वास ठेवू नका, नाहीतर सगळं काही खूप अडचणीचं ठरू शकतं, असं आवाहन रोहित पवारांनी केलं.
दिल्लीत पत्रकार रजत शर्मा यांच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनला गेलेला महाराष्ट्रातला अत्यंत मोठा नेता VSR च्या विमानाने परत येतो, प्रायव्हेट चार्टर टर्मिनलवर त्या नेत्याला VSR चा मालक व्ही. के. सिंग रिसिव्ह करतो, त्या नेत्याशी हस्तांदोलन करतो, त्या नेत्याच्या पीएच्या हातात काही… pic.twitter.com/T6vd6cj40R
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 10, 2026
महाराष्ट्र शासनसोबत आधी केवळ विमानसेवेपुरता मर्यादित असलेला व्ही. के. सिंग ज्याप्रकारे आंध्रप्रदेशमध्ये तेथील नेत्यांशी आर्थिक संबंध असल्याने तेथील मोठ्या प्रकल्पांच्या कामांसाठी मध्यस्थ, दलाल म्हणून काम करत होता त्याचप्रमाणे आज महाराष्ट्रात सुद्धा मोठ्या प्रकल्पांच्या कामासाठी मध्यस्थ, दलाल म्हणून भूमिका बजावत असल्याची नवी माहिती समोर येत आहे. ही माहिती सत्य असेल तर महाराष्ट्र सरकार अजून किती खालच्या पातळीला जाणार आहे? असा प्रश्न पडतो. इतकं सर्वकाही असताना सत्तेत असलेला पक्ष शांत बसून AAIB च्या अहवालाची प्रतीक्षा करतोय, याचं अधिक दुःख वाटतं. याप्रकरणी सीबीआयकडून अधिक सखोल चौकशी होईल, ही अपेक्षा, असंही रोहित पवार म्हणाले.












