satara violence case : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Satara ZP Election) झालेल्या राड्याचे आज सभागृहात पडसाद उमटले. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या अभूतपूर्व गोंधळाची विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी गंभीर दखल घेत सातारा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश दिले. मात्र, त्याच्या या आदेशाला मंत्री जयकुमार गोरे यांनी कडाडून विरोध केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे विधान परिषदेत नीलम गोऱ्हे आणि जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांचा बौध्दीक सामना पाहायला मिळाला.
धक्काबुकीत शंभूराज देसाई जखमी
दरम्यान, उपसभापती गोऱ्हे यांनी एसपींच्या निलंबनाचे निर्देश देऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश पुण्याच्या विभागीय आयुक्तांना दिले आहेत. तर मंत्री जयकुमार गोरे यांनी या निलंबनाला कडाडून विरोध केला. यामुळे विधानपरिषदेत सत्ताधाऱ्यांमध्येच आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्याचे दिसून आले. पालकमंत्री शंभूराज देसाई आणि कॅबिनेट मंत्री मकरंद पाटील यांना आपल्या सदस्यांना सभागृहात नेण्यासाठी पोलिस आणि प्रशासनाशी झुंज द्यावी लागली. या धक्काबुकीत शंभूराज देसाई जखमी झाले, तर मकरंद पाटील यांना 20-25 पोलिसांनी घेरल्याची घटना घडली होती. प्रशासकीय यंत्रणेचा वापर करून भाजपने आपला अध्यक्ष निवडून आणल्याचा आरोप करण्यात येत आहे.
वस्तुस्थिती जाणून न घेता अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई – गोरे
“सभापती महोदय तुम्ही कोणत्या प्रकारे वस्तुस्थिती जाणून न घेता एका अधिकाऱ्याला निलंबित करता कसं काय? तो आयपीएस दर्जाचा अधिकारी आहे. तुम्ही असा कसा निर्णय घेतला? तुमच्या निर्णयावर हरकत नाही. मात्र, जो निर्णय झाला आहे तो चुकीचा आहे. कार्यकर्ते कोणी आणले? भाजपवर कसं काय आरोप करता? तिथे जबरदस्ती सीइओ यांना बैठक कोणी घ्यायला लावली? असं म्हणत जयकुमार गोऱ्हे यांनी निलंबनाला कडाडून विरोध केल्याचे पाहायला मिळाले.
इतिहासात मंत्र्याला पोलिसांनी मारहाण केलीय असं कधी ऐकलंय? – देसाई
सभागृहात उपस्थित असताना नीलम गोऱ्हे यांनी आमची बाजू समजून घेतली. सभागृहात सांगण्यात आलं की, मंत्री जखमी झाला आहे. एवढी परिस्थिती निर्माण झाली होती म्हणून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. माझ्या अंगावर पूर्णपणे रक्त पडलं. मंत्र्याला मारहाण झालेली तुम्ही कधी ऐकले आहे का? सभापती तुम्ही सांगा बोलू नका. आम्ही तुमच्या समोर नतमस्तक होतो आणि इथून निघून जातो. तुम्ही लक्षात घ्या राज्याच्या इतिहासात आतापर्यंत कधीही मंत्र्याला पोलिसांनी मारहाण केली असं कधी ऐकलं आहे का? असा सवाल मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी उपस्थित केला.












