Gudi Padwa 2026 | आपल्या मराठी संस्कृतीतला महत्त्वाचा आणि मोठा सण म्हणज गुढीपाडवा (Gudi Padwa 2026). अवघ्या काही दिवसांवर गुढीपाडवा सण येऊन ठेपला आहे. त्यामुळे प्रत्येकजण गुढीपाडव्याची जोरदार तयारी करताना दिसत आहे. गुढीपाडव्याला मराठी कुटुंबांमध्ये घरोघरी गुढी उभारली जाते. तर गुढीपाडव्यादिवशी कडुलिंबांच्या (Neem Leaves) पानांना विशेष महत्त्व असते. कडुलिंबाची पाने गुढी उभारताना लावली जातात. सोबतच गुढी उभारून झाल्यानंतर गुळासोबत कडुलिंबाची पाने प्रसाद म्हणून खायला दिली जातात.
हेही वाचा – Gudi Padwa 2026: या वर्षी गुढी पाडवा कधी आहे? जाणून घ्या महत्त्व आणि परंपरा
कडुलिंबाच्या पानांचे महत्त्व काय?
बरेच लोक ही कडुलिंबाची पाने खायची टाळतात आणि फक्त गुळच खातात. तर काही लोक आवडीने ही पाने आणि गूळ खातात. पण तुम्हाला माहितीये का गुढीपाडव्याला कडुलिंबाच्या पानांना एवढं महत्त्व का आहे? बऱ्याच जणांना याबाबत माहिती नसेल. तर आता आपण कडुलिंबाच्या पानांना एवढं महत्त्व का असतं याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत.
गुढीपाडवा सण म्हणजे मराठी नवीन वर्ष आणि चैत्र मासाची सुरूवात. या खास दिवशी अभ्यंग स्नान केले जात. तर प्रत्येकजण आपल्या घरी आरोग्याची गुढी उभारतात. गुढीमध्ये कडुलिंबाची पाने देखील लावली जातात. कारण कडूलिंब हा एक सदाहरित वृक्ष असून तो आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो
चैत्र मासाची सुरूवात झाली की ग्रीष्म ऋतू सुरू होतो. मग ग्रीष्म ऋतूमध्ये उष्णतेचे अनेक आजार होताना दिसतात. मग या आजारांवर जर मात करायची असेल तर कडुलिंबाची पाने खाणे किंवा कडुलिंबाच्या पानांचा रस पिणे गरजेचं आहे. कारण कडुलिंबाची पाने ही जंतुनाशक असतात, त्यामुळे ती पाने खाल्ल्यामुळे कोणतेही व्हायरल आजार आपल्याला होत नाहीत आणि आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत राहण्यास मदत होते. त्यामुळे निरोगी आरोग्यासाठी गुढीपाडव्यादिवशी कडुलिंबाची पाने खाल्ली जातात. कडुलिंबाच्या पानांचे आणखी काही फायदे आहेत ते आपण जाणून घेणार आहोत.
कडुलिंबाची पाने खाल्ल्यामुळे शरीराला काय फायदे होतात?
कडुलिंबाच्या पानांमध्ये पित्तनाशक गुणधर्म असतो, जो आपल्या शरीरातील पित्त कमी करण्यास मदत करतो. तसेच ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे अशा लोकांना कडुलिंबाची पाने फार उपयुक्त ठरतात.
महत्त्वाचं म्हणजे गुढीपाडव्याच्या वेळी उन्हाळ्याला सुरूवात होत असते. त्यामुळे वाढत्या उन्हामुळे बऱ्याच लोकांना त्वचेचा, उष्णतेचा त्रास होत असतो. तर कडुलिंबाची पाने त्वचेच्या आणि उष्णतेच्या त्रासावर मात करण्यास मदत करतात. त्यामुळे गुढीपाडव्याला अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने टाकून अभ्यंग स्नान करण्यास सांगितलं जातं, ज्यामुळे आपले शरीर निरोगी राहण्यास मदत होते.











