दुबई : आशिया चषकात आतापर्यंत पाकिस्तान क्रिकेट संघ त्यांच्या खेळापेक्षा मैदानावरील नाट्यामुळं जास्त चर्चेत आहे. 21 सप्टेंबर रोजी दुबई इथं झालेल्या भारतीय संघाविरुद्धच्या सुपर-4 सामन्यादरम्यान साहिबजादा फरहान आणि हारिस रौफ हे दोन पाकिस्तानी खेळाडू लज्जास्पद वर्तन करताना दिसले. त्यानंतर, बीसीसीआयनं आता या दोन्ही खेळाडूंविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करत आयसीसीकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे.
बीसीसीआयनं ईमेल पाठवून केली तक्रार :
वास्तविक 21 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान पाकिस्तानी वेगवान गोलंदाज हारिस रौफनं वारंवार भारतीय खेळाडूंना डिवचण्याचा प्रयत्न केला. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना, भारतीय चाहत्यांनी “कोहली, कोहली!” अशी घोषणाबाजी केली तेव्हा रौफनं विमान पाडण्याचा इशारा केला. हे कृत्य संपूर्ण क्रिकेट जगतानं पाहिले. तसंच या सामन्यात पाकिस्तानी फलंदाज साहिबजादा फरहाननं बंदुकीचा इशारा करुन आपलं अर्धशतक साजरं केलं. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत फरहान म्हणाला, “50 धावा काढल्यानंतर मी सहसा जास्त आनंद साजरा करत नाही, पण अचानक माझ्या मनात आलं, ‘चला आज आनंद साजरा करूया.’ लोक ते कसे घेतील हे मला माहित नाही, पण मला काही फरक पडत नाही.”
दोन्ही खेळाडूंना आयसीसीला द्यावं लागेल स्पष्टिकरण :
बीसीसीआयच्या तक्रारीनंतर, जर हरिस रौफ आणि साहिबजादा फरहान यांनी लेखी आरोप नाकारले तर त्यांना आयसीसी एलिट पॅनेल रेफरी रिची रिचर्डसन यांच्यासमोर सुनावणीसाठी हजर राहावं लागू शकते. जर ते नियमांनुसार त्यांची कृती सिद्ध करण्यात अयशस्वी झाले तर त्यांच्यावर बंदी घालण्यात येऊ शकते. बीसीसीआयच्या तक्रारीला उत्तर म्हणून, पीसीबीनं भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवविरुद्ध आयसीसीकडे तक्रार दाखल केली आहे, ज्यामध्ये 14 सप्टेंबरच्या सामन्यानंतर सूर्याच्या विधानाचा हवाला दिला आहे. मात्र आयसीसी त्यांची तक्रार नाकारु शकते, कारण टिप्पणीच्या सात दिवसांच्या आत तक्रारी दाखल कराव्या लागतात.