वॉशिंग्टन : गेली दोन वर्षे इस्त्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरु असताना मध्यपूर्वेत अशांतता आणि अस्थिरतेचं चित्र निर्माण झालं आहे. अशा परिस्थितीत काहीशी दिलासादायक बातमी आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यानुसार इस्रायल आणि हमास यांनी गाझा शांतता योजनेतील पहिल्या टप्प्यावर स्वाक्षरी केल्या आहेत. ट्रम्प यांनी याबाबतची बुधवारी घोषणा केली. इस्रायल आणि गाझामधील हमास यांच्यातील युद्धबंदी कराराचा पहिला टप्पा आज (गुरुवार, 9 ऑक्टोबर) पूर्ण होणार आहे. इजिप्तमध्ये भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 करारावर स्वाक्षरी होणार आहे.
ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्ट काय :
दोघंही शांतता योजनेच्या पहिल्या टप्प्यावर सहमत झाले आहेत. त्यामुळं युद्ध थांबवलं जाईल. ओलिस नागरिकांना आणि कैद्यांना सोडण्यात येईल. इस्रायल आपलं सैन्य एका विशिष्ट सीमेवर मागे घेईल. हे एक ठोस आणि चिरकालीन शांततेच्या दिशेनं पहिलं पाऊल असेल, असं ट्रम्प यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं आहे. हमासकडून या आठवड्याच्या शेवटी इस्त्रायलच्या 20 ओलिसांना सोडण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. तर इस्रायली सैन्यानं गाझाच्या बहुतेक भागातून माघार घेण्यास सुरुवात केली आहे. इस्रायलला गाझा कराराचं पूर्णपणे पालन करण्यास भाग पाडावं, असं हमासनं ट्रम्प यांना आवाहन केलं आहे.
इजिप्तमधील बैठकीनंतर शांततेच्या दृष्टीनं पहिलं पाऊल :
या आठवड्यात इजिप्तमध्ये हमासच्या इस्रायलशी अप्रत्यक्ष वाटाघाटी झाल्या आहेत. त्यानुसार गाझामधील युद्ध संपवण्याची तरतूद करणारा करार करण्यात आल्याचं पॅलेस्टिनी दहशतवादी गट असलेल्या हमासनं म्हटलं आहे. या कराराबाबत हमासनं म्हटलं, गाझामधील युद्ध संपवण्याकरिता, ताब्यातून माघार घेण्याकरिता, मानवतावादी मदत करण्याकरिता आणि कैद्यांची देवाणघेवाण करण्याकरिता तरतूद करणारा करार करण्यात आला आहे.
ट्रम्पचे आभार :
नेतन्याहू यांनी अप्रत्यक्ष वाटाघाटीनंतर झालेल्या कराराबाबत ट्रम्प यांचे आभार मानले आहेत. देवाच्या मदतीनं, आम्ही त्या सर्वांना घरी परत आणू, असा विश्वास इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी व्यक्त केला. ओलिसांची सुटका होणार असल्यानं हे राजनैतिक यश आणि इस्रायल राज्यासाठी राष्ट्रीय आणि नैतिक विजय असल्याचं म्हटलं आहे. ते गाझामधील बंदिवानांच्या सुटकेच्या योजनेला मंजुरी देण्यासाठी इस्त्रायलच्या मंत्रिमंडळाची आज बैठक घेणार आहेत.