वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 ऑक्टोबरपासून परदेशी औषधी, स्वयंपाकघरातील कॅबिनेट, फर्निचर आणि जड ट्रकवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क जाहीर केलं आहे. त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितलं की हे पाऊल देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आहे. औषधांवर 100% कर, स्वयंपाकघरातील कॅबिनेट आणि बाथरुम व्हॅनिटीजवर 50% कर, अपहोल्स्टर्ड फर्निचरवर 30% कर आणि जड ट्रकवर 25% कर लादला जाईल, असं ट्रम्प यांनी सांगितलं.
काय म्हणाले ट्रम्प : ट्रम्प यांनी याबाबत केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “1 ऑक्टोबर 2025 पासून, आम्ही कोणत्याही ब्रँडेड किंवा पेटंट केलेल्या औषध उत्पादनावर 100% कर लादणार आहोत. कंपन्या जर अमेरिकेत उत्पादन कारखाना बांधत असतील तरच त्यांना करातून सूट मिळेल. जर त्या कंपन्या ब्रेकिंग ग्राउंड किंवा ज्यांचं बांधकाम सुरु असेल तर त्यांना सूट मिळेल.
ट्रम्प यांची सोशल मीडिया पोस्ट : दुसऱ्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “आम्ही 1 ऑक्टोबर 2025 पासून सर्व स्वयंपाकघरातील कॅबिनेट, बाथरुम व्हॅनिटी आणि संबंधित उत्पादनांवर 50% कर लादणार आहोत. याव्यतिरिक्त, आम्ही अपहोल्स्टर्ड फर्निचरवर 30% कर लादणार आहोत.” याचं कारण म्हणजे इतर परदेशी देशांकडून अमेरिकेत या उत्पादनांची आयात मोठ्या प्रमाणात होत आहे. हे अत्यंत अन्याय्य आहे, परंतु राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि इतर कारणांसाठी आपण आपल्या उत्पादन प्रक्रियेचं संरक्षण केलं पाहिजे.
अमेरिकेत महागाई वाढेल : त्यांनी आरोप केला की परदेशी कंपन्या अमेरिकन बाजारपेठेत फर्निचर आणि कॅबिनेट भरत आहेत, ज्यामुळं देशांतर्गत उद्योगावर परिणाम होत आहे. त्याचप्रमाणे, परदेशी जड ट्रक आणि सुटे भाग अमेरिकन लोकांसाठी आव्हान निर्माण करत आहेत. ट्रम्प म्हणाले की, हे पाऊल केवळ देशांतर्गत उद्योगांचं रक्षण करण्यासाठीच नाही तर राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी देखील आवश्यक आहे. हे पाऊल अशा वेळी उचलण्यात आले आहे जेव्हा अमेरिकेत महागाई आधीच जास्त आहे. तज्ञांचा असा विश्वास आहे की या अतिरिक्त शुल्कांमुळं महागाई आणखी वाढू शकते आणि आर्थिक वाढीचा वेग मंदावू शकतो.