Indian Railways Fine Rules 2026: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर आता अधिक कठोर कारवाई केली जाणार आहे. आजपासून लागू झालेल्या नव्या नियमांनुसार दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. जाणून घ्या, नवीन नियम काय आहेत आणि किती दंड भरावा लागू शकतो
रेल्वेने विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात कठोर भूमिका घेत नवीन नियम लागू केले आहेत. २० जून २०२६ पासून विनातिकीट प्रवासासाठी आकारला जाणार किमान दंड दुप्पट करण्यात आला आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांना यापुढे अधिक आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.
हेही वाचा: २० वर्षांनी निकाल; पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरण नेमकं काय होत?
कायदा २०२६ अंतर्गत
केंद्र सरकारच्या जन विश्वास कायदा २०२६ अंतर्गत रेल्वे कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार रेल्वे कायदा १९८९ मधील कलम १३७ आणि १३८ मध्ये बदल करून विनातिकीट प्रवासासाठीचा किमान दंड २५० रुपयांवरून ५०० रुपये करण्यात आला आहे. रेल्वे मंत्रालयाने १९ जून रोजी यासंदर्भातील अधिसूचना जारी केली असून नवीन नियम २० जूनपासून अंमलात आले आहेत.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, अलीकडच्या काळात प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. मध्य रेल्वेच्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात जवळपास ४.९६ लाख प्रवासी विनातिकीट प्रवास करताना आढळले. त्यांच्याकडून सुमारे ४०.८५ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या वाढत्या प्रकारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी दंडात्मक तरतुदी अधिक कठोर करण्यात आल्या आहेत.
तिकीट नसल्यास काय होईल?
नवीन नियमांनुसार खालील प्रकार गंभीर उल्लंघन मानले जाणार आहेत:
वैध तिकीट किंवा पासशिवाय रेल्वे प्रवास करणे
आधी वापरलेले तिकीट पुन्हा वापरण्याचा प्रयत्न करणे
फसवणुकीच्या उद्देशाने प्रवास करणे
अशा प्रकरणांमध्ये संबंधित प्रवाशाकडून पूर्ण प्रवासभाडे वसूल केले जाईल. याशिवाय त्याच रकमेइतका अतिरिक्त दंड आकारला जाईल. मात्र हा दंड कोणत्याही परिस्थितीत ५०० रुपयांपेक्षा कमी असणार नाही.
तसेच, प्रवाशाने नेमक्या कोणत्या स्थानकापासून प्रवास सुरू केला याचा पुरावा उपलब्ध नसल्यास, त्या रेल्वेगाडीच्या प्रारंभ स्थानकापासूनचे भाडे आकारले जाईल. त्यामुळेविनातिकीट प्रवास करणाऱ्यांना यापुढे अधिक मोठी रक्कम भरावी लागू शकते.
Website : https://lokshevay.com/










