मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदान येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस असून, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभरातून मराठा बांधव मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. चर्चगेट, मंत्रालय परिसर, नरिमन पॉईंट आणि समुद्रकिनारपट्टीवर मराठा आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारविरोधात आपला रोष व्यक्त केला. विशेषतः नरिमन पॉईंट परिसरात “एक मराठा, लाख मराठा” अशा घोषणा देत आंदोलकांनी रस्ता रोको केला. या आंदोलनामुळे परिसरातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.