छत्रपती संभाजीनगर : राज्याचे गृहनिर्माण तथा इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या गाडीवर शनिवारी सकाळी दगडफेक करण्यात आली. या घटनेत गाडीची समोरील काच फुटली असून पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले आहे. तो मनोरुग्ण असल्याचे समोर आले आहे.
ही घटना गारखेडा येथील मंत्री सावे यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर सकाळी ११.१५ वाजता घडली. गणेश सखाराम शेजुळ (रा. पुंडलिकनगर, छत्रपती संभाजीनगर) या तरुणाने उपचारासाठी पैशांची मागणी केली होती. मात्र अपेक्षेपेक्षा कमी पैसे मिळाल्याचा राग येऊन त्याने बाहेर जाऊन मंत्री सावे यांच्या गाडीवर दगड मारला. यात वाहनाच्या चालकाच्या बाजूची काच फुटली.
घटनेनंतर आरोपीला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. शेजुळ हा २०१० पासून मनोरुग्ण असल्याने त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.