मुंबई : आशिया चषकता रविवारी 21 सप्टेंबरला पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान क्रिकेट संघात सामना झाला. या सामन्यादरम्यान पाकिस्तानी फलंदाजानं केलेल्या वादग्रस्त कृतीमुळं विरोधकांकडून खास करुन शिवसेना ठाकरे गटाकडून बीसीसीआय तसंच मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. “आठ वाजता मॅच झाली आणि पाच वाजता मोदींनी जीएसटी कपातीची घोषणा केली. जीएसटी कपातीतून लोकांना काय मिळणार आहे? त्याऐवजी मोदींनी लोकांना 15 लाख दिले असते तर बरं झालं असतं. अंधभक्तांना मॅच पाहता यावी म्हणून मोदींनी 5 वाजता जीएसटी कपाताची घोषणा केली. मोदी, अमित शहा आणि जय शहांनी ही कालची मॅच पाहिली. माझ्या माहितीप्रमाणे जय शहा हे काल मुंबईत होते. परंतु हल्ल्यात आमच्या 26 आया-बहिणीचं कुंकू पुसलं गेलं, त्या पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळताच कशाला?” असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी उपस्थित करत केंद्र सरकारवर टीका केली. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
जय शहांना भारतरत्न पुरस्कार द्या :
सामन्यावरुन बोलताना राऊत म्हणाले, “देशवासियांची भावना आहे की, पाकिस्तासोबत क्रिकेट नको, तरी पण पैशासाठी मॅच खेळली गेली. अमित शहा, जय शहा यांनी पाकिस्तानसोबत क्रिकेट मॅच खेळवून मोठं महान कार्य केलं आहे. जय शाह यांना त्यांच्या या कार्यासाठी भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे. काल पाकिस्तानचा खेळाडू साहबजादा फराहन याचं अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर त्यानं बॅट घेऊन AK – 47 नं धडाधाड गोळ्या घालतोय, अशी कृती केली. ती कृती कुणासाठी आणि कशासाठी होती?” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. तसंच गेल्या सामन्यात त्याला भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवनं पाकिस्तानच्या खेळाडूंशी शेकहॅड केला नाही म्हणून मोठं कौतूक झालं होत. मग साहबजादा फराहननं AK – 47 दाखवलं तेव्हा भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवनं त्या साहबजादा फराहनच्या कंबड्यात लाथ घातली पाहिजे होती, असंही राऊत म्हणाले.
25 हजार कोटी पाकिस्तानला मिळाले :
क्रिकेट मॅचमधून भाजपाला पैसा कमवायचा आहे. भारत-पाकिस्तान मॅचवर दीड लाख कोटीचा सट्टा खेळला गेला आणि हा सट्टा गुजरातमधून खेळला गेला. त्यातून 25 हजार कोटी रुपये पुन्हा एकदा पाकिस्तानला मिळाले आहेत. कालच्या मॅचमध्ये मुंबई, गुजरात आणि राजस्थानमधून दीड लाख कोटीचा सट्टा खेळाला आणि त्यातून 25 हजार कोटी हे पाकिस्तानला गेले आणि त्याच पैशातून पाकिस्तानला आर्थिकदृष्ट्या सक्षम केलं जात आहे. हा पैसा दहशतवाद्यांना पुरवला जातो आणि तोच पैसा आम्हाला मारण्यासाठी वापरला जातोय, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसंच पाकिस्तानला क्रिकेटसाठी बॅन करायचं की नाही हा आंतरराष्ट्रीय मुद्दा आहे. पण या देशातील 140 कोटी जनतेची साधी आणि सरळ भावना आहे की, पाकिस्तासोबत क्रिकेट नको आणि जय शहांनी जर ठरवलं तर ते पाकिस्तानवर बंदी आणू शकतात. कारण ते आयसीसीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या वडिलांनी काश्मीरमधील 370 कलम हटवलं, मग दोघांचं देशभक्तीचं रक्त एकच आहे ना, अशी खोचक टिका राऊतांनी शहा पिता-पुत्रावर केली.