मुंबई : मागील 19 महिन्यांपासून पुनर्बांधणीच्या कामामुळं बंद असलेला दादर येथील ऐतिहासिक शिवाजी पार्क जिमखाना आज, सोमवारी (दि. 22) घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर पुन्हा सर्वांसाठी खुला झाला आहे. हेरिटेज लूकसह आधुनिक सुखसोयींनी युक्त असलेल्या या जिमखान्याचं लोकार्पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ‘भारतरत्न’ मास्ट ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या उपस्थितीत थाटामाटात पार पडला. यावेळी अनेक दिग्गज नेते आणि क्रिकेटपटू उपस्थित होते.
अनेक खेळाडूंना दिलं प्रशिक्षण :
1909 साली स्थापन झालेला हा जिमखाना त्यावेळी ‘दादर हिंदू जिमखाना’ या नावानं ओळखला जात होता. पुढं ‘माहीम पार्क’चं नाव ‘शिवाजी पार्क’ झाल्यानंतर या जिमखान्याचं नावही ‘शिवाजी पार्क जिमखाना’ असं बदललं गेलं. गेल्या शतकभरात या जिमखान्यानं अनेक दिग्गज खेळाडूंना घडवलं आहे. यात दिग्गज क्रिकेटपटू विजय मांजरेकर, सुभाष गुप्ते, अजित वाडेकर, संदीप पाटील, भारतरत्न सचिन तेंडुलकर, अजित आगरकर, प्रवीण आमरे, विनोद कांबळी आणि पृथ्वी शॉ यांसारखे अनेक प्रसिद्ध खेळाडू घडले आहेत, ज्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटमध्ये यश मिळवलं. हे ठिकाण ‘भारतातील क्रिकेटची नर्सरी’ म्हणून ओळखलं जातं, जिथं रमाकांत आचरेकर यांच्यासारख्या दिग्गज प्रशिक्षकांनी अनेक खेळाडूंना प्रशिक्षण दिलं.
आत्मा आणि परंपरा कायम :
शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षाच्या उंबरठ्यावर असताना या जिमखान्याची पुनर्बांधणी नव्या पिढीच्या अपेक्षांना साजेशी करण्यात आली आहे. जिमखान्याचे अध्यक्ष प्रवीण आमरे यांनी यावेळी सांगितलं, “जिमखान्याचा चेहरामोहरा बदलला असला, तरी त्याचा आत्मा आणि परंपरा कायम आहे.” पुनर्बांधणीच्या प्रक्रियेत अत्याधुनिक सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे. डिजिटल प्रवेश प्रणाली, अत्याधुनिक जिम, स्मार्ट सेफ्टी मॉनिटरिंग, नवे स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि आकर्षक इंटीरिअर यामुळं जिमखाना आधुनिक काळाशी सुसंगत बनला आहे.
जुन्या आठवणी ताज्या झाल्या :
उद्घाटनानंतर माध्यमांशी संवाद साधताना भारतरत्न सचिन तेंडुलकर म्हणाला, “शिवाजी पार्क जिमखान्याच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आज जुन्या आठवणी ताज्या झाल्या. इथल्या कॅन्टीनमध्ये मी मित्रांसोबत वडापाव खायचो, त्याची चव आजही जिभेवर आहे. या वास्तूचा कायापालट झालेला पाहून समाधान वाटलं. अनेक दिग्गज खेळाडू शिवाजी पार्क जिमखान्यानं घडवले. आज अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार. त्यांनी यासाठी अतिशय मेहनत घेतली. मला भावलेली सर्वात मोठी बाब म्हणजे इथं मुलींसाठी ड्रेसिंग रुम तयार केला आहे. माझी सगळ्या क्लबना विनंती की मुलींसाठी अशाप्रकारे चेंजिग रुम तयार करावी. कारण मुलींचा क्रिकेटमधील सहभाग वाढत आहे. माझ्या वतीनं शिवाजी पार्क जिमखान्याच्या सर्व आजी-माजी आणि क्रिकेटपटूना शुभेच्छा.”