राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असतात. मात्र, सध्या राज्यात ठाकरे बंधूंच्या युतीची जोरदार चर्चा आहे. ठाकरे बंधू अनेक वर्षानंतर एकत्र आले, मात्र दोन्ही पक्षांची युती कधी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असताना आता याबाबतचे सूचक संकेत समोर येत आहेत. आज झालेल्या शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत राऊत यांनी हे संकेत दिले आहेत. तर दादरमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्रित बॅनर देखील झळकला आहे.
ठाकरे बंधूंच्या पक्ष दसऱ्याला करणार युती?
शिवसेना उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी (30 सप्टेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची आणि राज ठाकरेंच्या मनसेची येत्या दसरा मेळाव्यात युती होण्याचे संकेत दिले आहेत. यावेळी बोलताना ते म्हणाले,”चर्चा आहे, चांगली चर्चा आहे. उद्धव ठाकरे, राज ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. दसऱ्याला वैचारिक आदान प्रदान होऊ शकतं,” असं सूचक विधान राऊतांनी केलं. यामुळे, 2 ऑक्टोबर रोजी शिवतीर्थावर होणाऱ्या ठाकरेंच्या दशहरा मेळाव्यात शिवसेना उबाठा आणि मनसे या दोन पक्षांची युती होण्याची शक्यता आहे.
मुंबईत एकाच बॅनरवर झळकले ठाकरे बंधू
मुंबईतील दादर TT परिसरातील एका उड्डाणपुलावर मनसे आणि शिवसेना उबाठा पक्षाच्या नेत्यांचे एकत्रित बॅनर पाहायला मिळाले.या बॅनरवर राज ठाकरे, उद्धव ठाकरे,अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे, यांचे एकत्रित फोटो पाहायला मिळाले. याशिवाय मुंबई आपली आहे इथे आवाजही आपलाच हवा अशा आशयाचा मजकूर पाहायला मिळत आहे. तसेच मराठी माणसा जागा हो, न्याय हक्कासाठी एक हो असे देखील लिहिल्याचे पाहायला मिळाले. तर लालबाग परळ प्रतिष्ठानच्या वतीने हा बॅनर लावण्यात आला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्रित लढणार
काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एकत्र लढणार असून यासाठीच फॉर्म्युला देखील ठरला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका ही नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रबिंदू राहिली आहे. 74,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त बजेट असलेली मानली जाते. तर गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून अविभाजित शिवसेनेने या महापालिकेवर सत्ता टिकवून ठेवण्यात यश मिळवले होते. 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाले, तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) म्हणून ओळख मिळाली. या ऐतिहासिक फुटीनंतरची ही पहिलीच मोठी निवडणूक असणार आहे. 2022 पासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 January 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे, सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत.
गत विधानसभा निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या मनसेच्या पदरात निराशा आली होती. त्यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 95 जागांवर लढली होती, मात्र त्यांना केवळ 20 जागांवर विजय मिळाला होता. शिवसेनेच्या 30 वर्षांच्या इतिहासातील ही सर्वात खराब कामगिरी होती. तर दुसरीकडे, मनसेला एकाही जागेवर विजय मिळवता आला नव्हता. त्यामुळे, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आपली ताकद टिकवून ठेवण्यासाठी आणि नव्याने आपली कामगिरी सिद्ध करण्यासाठी या दोन्ही पक्षांना एकत्र येणे अपरिहार्य झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.