India vs New Zealand World Cup 2025 : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघानं वनडे विश्वचषकाच्या एका महत्त्वाच्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला. उपांत्य फेरीत प्रवेश करण्याच्या दृष्टीनं हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा होता, परंतु भारतानं विजय मिळवला. भारतानं हा सामना 53 धावांनी जिंकला आणि उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांनी आधीच अंतिम चारमध्ये आपलं स्थान निश्चित केले आहे. चौथा संघ म्हणून भारताचा प्रवेश आता निश्चित मानला जात आहे.
पावसाचा सामन्यात व्यत्यय :
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील महिला वनडे विश्वचषकाच्या महत्त्वाच्या सामन्यात पुन्हा एकदा पावसानं व्यत्यय आणला. टीम इंडियाचा डाव 48 षटकांपर्यंत पोहोचला तेव्हा अचानक पाऊस पडला, जो बराच काळ चालू राहिला. त्यानंतर पंचांनी सामना 49 षटकांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला. पाऊस थांबल्यानंतर भारतीय संघानं आणखी एक षटक फलंदाजी केली. टीम इंडियानं 49 षटकांत तीन गडी गमावून 340 धावांचा भक्कम आकडा गाठला. स्मृती मंधाना आणि प्रतीका रावल यांनी यात सर्वात मोठी भूमिका बजावली, दोघींनीही शतकं झळकावली.
स्मृती मंधाना आणि प्रतिका रावल यांची मोठी खेळी :
स्मृती मंधानानं 95 चेंडूत 109 धावा केल्या, ज्यात 10 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. त्यानंतर प्रतिका रावलनं 134 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकारांसह 122 धावा केल्या. दोघींनी पहिल्या विकेटसाठी 200 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली. ही भारताच्या विजयाची जवळजवळ सुरुवात होती. नंतर जेमिमा रॉड्रिग्जनं 55 चेंडूत 76 धावा केल्या. मात्र कर्णधार हरमनप्रीत कौरची बॅट शांत राहिली. तिनं 11 चेंडूत 10 धावांची संक्षिप्त खेळी केली.
डकवर्थ-लुईस पद्धतीनुसार न्यूझीलंडला लक्ष्य :
भारतीय संघानं 49 षटकांत 340 धावा केल्या होत्या, म्हणजेच न्यूझीलंडनं 341 धावा करायला हव्या होत्या. परंतू न्यूझीलंडचा डाव सुरु होण्यापूर्वीच हलक्या पावसामुळं पुन्हा खेळात व्यत्यय आला. त्यानंतर पंचांनी डकवर्थ-लुईस पद्धतीनं न्यूझीलंडला 44 षटकांत 325 धावांचं लक्ष्य दिलं. हे एक मोठं लक्ष्य होतं आणि न्यूझीलंडच्या सुरुवातीच्या अपयशामुळं संघाचा खेळ खराब झाला.
And then there were 𝐟𝐨𝐮𝐫 🏆
All the #CWC25 semi-finalists are now confirmed ✅
More ➡️ https://t.co/E4R02dgvdE pic.twitter.com/RHguNYg61A
— ICC (@ICC) October 23, 2025
न्यूझीलंडला सुरुवातीला मोठे धक्के :
न्यूझीलंडची सलामीवीर सुझी बेट्स संघाची धावसंख्या फक्त एक धाव असताना बाद झाली. त्यानंतर अमेलिया केर आणि जॉर्जिया प्लिमर यांनी 50 धावांची भागीदारी केली. संघाचा धावसंख्या 51 असताना जॉर्जिया प्लिमर बाद झाली. त्यानंतर काही वेळातच सोफी डेव्हाईन देखील माघारी परतली. तिथून भारताचा विजय जवळजवळ निश्चित झाला. सोफी केवळ 6 धावा करण्यात यशस्वी झाली. त्यानंतर सुरु झालेला विकेट पडण्याचा क्रम शेवटपर्यंत थांबला नाही.
हे हि वाचा : विराट कोहली सलग दुसऱ्यांदा शून्यावर आउट; चांहत्यांची निराशा
भारताचा पुढील सामना बांगलादेशविरुद्ध :
दरम्यान, गुणतालिकेच्या बाबतीत, तीन संघांनी आधीच उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. ऑस्ट्रेलिया सध्या 11 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. 10 गुणांसह दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे. 9 गुणांसह इंग्लंड तिसऱ्या स्थानावर आहे. टीम इंडिया आता 6 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडकडे सध्या फक्त चार गुण आहेत. भारतीय संघ 26 ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्ध आपला शेवटचा साखळी सामना खेळेल












