NCP office Vajle Ki Bara video : अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एक व्हायरल लावणीमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. नागपूर शहरातील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमातील हा लावणी नृत्याचा व्हिडिओ आहे. तो सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे विरोधकांकडून अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित केले जात असून, कार्यक्रमाच्या आयोजकांवर जोरदार टीकास्त्र डागले जात आहे.
दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या हस्ते नागपूर येथील शहरातील कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर दिवाळी मिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात उपस्थितांचे मनोरंजन करण्यासाठी एका महिला पदाधिकाऱ्याने ‘वाजले की बारा’ या लावणीवर नृत्य केले. हे नृत्य राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या शहर कार्यालयात, शहराध्यक्ष आणि इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आले. त्यामुळे विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे.
पक्ष कार्यालयात अशा प्रकारच्या लावणी नृत्याचे सादरीकरण कितपत योग्य आहे, हा मुख्य प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून समाज माध्यमांवर शहराध्यक्ष यांच्यावर टीका केली जात आहे. त्यांनी अशा कार्यक्रमाचे आयोजन कसे केले आणि त्यांच्या उपस्थितीत हे नृत्य कसे सादर झाले, यावर जोरदार चर्चा सुरू आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळातही एकच खळबळ उडाली आहे.
गौतमी पाटील महाग झाली होती का म्हणून महिला पदाधिकारी नाचवली…💃💃💃
लाज वाटली पाहीजे महाराष्ट्रातला आमचा शेतकरी बांधव संकटात आहे😡… आणि तुम्ही मौजमस्तीत व्यस्त आहे.#nagpur #Maharashtra #Ncp #महायुती_सरकार #नागपूर #गणेशपेठ@ShivSenaUBT_ pic.twitter.com/YZd6uCnB5O
— मी शिवसैनिक🔥गिरीष चव्हाण,🔥बाळासाहेब ठाकरे समर्थक (@Mi_Shivsainik) October 27, 2025
लावणी सादर करण्यासाठी कोणत्याही बाहेरील कलाकारांना बोलवण्यात आले नव्हते. पक्षाचे कार्यकर्ते दिवाळी मिलनाच्या निमित्ताने आपली कला सादर करत होते. लावणी महाराष्ट्राची संस्कृती आहे. या कार्यक्रमात मीसुद्धा डान्स केला. बघणाऱ्यांच्या नजरेत दोष आहे. लावणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खासदार सुनेत्रा पवार यांनी फोन केल्याचे नागपूर शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल अहिरकर यहानी सांगितले.
असे प्रकार करणे अतिशय दुर्दैवी NCP office Vajle Ki Bara video
अतिशय अस्वस्थ करणारा हा व्हिडिओ आहे. हे खूप दुर्दैवी आहे. त्या कुटुंबात देखील आम्ही होतो. तुम्ही शरद पवारांकडून अशा गोष्टी करण्यासाठी पक्ष काढून घेतला आहे का? हा पक्ष उभा करण्यासाठी अनेकांनी मेहनत घेतली आहे. तिथे असे प्रकार करणे अतिशय दुर्दैवी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
नागपूर येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात लावणीवर नृत्य केल्याचा प्रकार निषेधार्ह आहे. या प्रकरणी संबंधितावर योग्य ती कारवाई केली जाईल. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी सांगितले.
मात्र ते पक्ष चोरून घेऊन गेले
मी व्हिडिओ पाहिला नाही. मात्र लावणीची संस्कृती जपत असतील कदाचित. शरद पवार यांनी हा पक्ष वाढवला. हा पक्ष लोकांनी घराघरात पोहोचवला. मात्र ते पक्ष चोरून घेऊन गेले. आता ते पक्ष कार्यालयात वाजले की बारा हे गाणं लावत आहेत. पक्षाचेच बारा वाजले आहेत. असे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.











