Important meeting : राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जनशक्ती प्रहार संघटनेचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे महाएल्गार आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला राज्यातील शेतकऱ्यांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे. आज सायंकाळी ७ वाजता बच्चू कडूंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित असतील. तर आंदोलकांकडून बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेव जानकर, अजित नवले यांच्यासह अन्य काही शेतकरी नेते उपस्थित राहणार आहे. त्यामुळे आज काही तोडगा निघणार का याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
ही उच्चस्तरीय बैठक असल्याने या बैठकीला मुख्य सचिवांसोबतच विविध विभागातील 30 वरीष्ठ अधिकारी देखील उपस्थित असतील. त्यामुळे आजच्या या बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांना संबोधित करताना कडू यांनी शेतकरी सर्व मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सरकारलाच एक पाऊल मागे घेऊन शेतकरी नेत्यांच्या मागण्या मान्य केल्याखेरीज पर्याय उरलेला नाही.
हे ही वाचा – महाराष्ट्र ‘रिइमॅजिनिंग मॅन्युफॅक्चरिंग’चा नवा चेहरा होणार; मुख्यमंत्री फडणवीस
परत आल्यावर आम्ही आंदोलनाची दिशा ठरवू
सर्व शेतकरी नेते एकत्र आले हे या आंदोलनाचे मोठे यश आहे. आम्ही एकत्र आल्याने शेतकऱ्यांना बळ मिळते. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचा विचार करत नाहीत. आजच्या बैठकीनंतर तोडगा निघाला नाही तर मुंबईवरून नागपूरला परत आल्यावर आम्ही आंदोलनाची दिशा ठरवू. आजच्या बैठकीत कर्जमाफी , पंजाबच्या धर्तीवर शेतमाल खरेदी केंदे, २० टक्के बोनस , हमीभाव याबाबत चर्चा होईल, असे बच्चू कडू यांनी सांगितले.
जेल भरोच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या शिष्टमंडळासोबत आज प्राथमिक चर्चा झाली. या चर्चेत कर्जमाफीसह इतर महत्त्वाच्या मागण्यांवर तोडगा काढण्याबाबत चर्चा झाली असून उद्या उच्चस्तरीय बैठक घेण्यात येणार आहे.
“जर उद्याच्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला नाही, तर ३१ ऑक्टोबर रोजी रेल रोको… pic.twitter.com/LAMGKiO0Gp
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) October 29, 2025
सरकार दिलेला शब्द पाळत नाही Important meeting
सरकार कर्जमुक्ती करतो म्हणून सांगतंय पण तारीख देत नाही. यापूर्वी अनेक आंदोलने झाली सरकारने कर्जमाफी देण्याच आश्वासन दिले, मात्र शब्द पाळला नाही. चर्चेतून मार्ग निघतो, असे सांगून त्यांनी आंदोलनात सहभागी झालेल्यांची चर्चेसाठी जाण्याची मंजूरी घेतली. यावेळी सरकारने चर्चेतून मार्ग नाही काढला तर रेल्वे बंद करू, असा इशारा देखील दिली आहे. सोबतच आंदोलकांना मैदान न सोडण्याचे आवाहन केले आहे.
बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या –
– अटी शर्तीं शिवाय शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा
– नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा.
– गाईच्या दुधाला ५० रुपये तर म्हशीच्या दुधाला ६५ रुपये भाव द्या.
– उसाला प्रती टन ४ हजार ३०० प्रमाणे एफआरपी द्या
– अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई देण्यात यावी.
– कांद्यावरील निर्यात शुल्क कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा.
– शेतमालाला योग्य हमीभाव देण्यात यावा, यांसह अन्य मागण्या करण्यात आल्या आहेत.












